पालकांनो, मुलांवर अपेक्षा लादू नका : नरेंद्र मोदी

टीम ईसकाळ
रविवार, 29 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करताना पालकांच्या अपेक्षा, परीक्षेचा दबावासह अन्य विषयांवर भाष्य केले. आपल्या पाल्यांवर अपेक्षा ओझे लादू नये, असे आवाहन मोदी यांनी यावेळी पालकांना उद्देशून केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करताना पालकांच्या अपेक्षा, परीक्षेचा दबावासह अन्य विषयांवर भाष्य केले. आपल्या पाल्यांवर अपेक्षा ओझे लादू नये, असे आवाहन मोदी यांनी यावेळी पालकांना उद्देशून केले.

ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले, अशा शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आपण 30 जानेवारी रोजी सकाळी दोन मिनिटे मौन बाळगावे, असे आवाहन मोदी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना केले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्‍मिरमधील हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोदी यांनी यावेळी अभिनंदन केले. तसेच, तरुणाईने इंटरनेटचा वापर करून नवनवीन संशोधने करण्याचे आवाहनही केले. 30 जानेवारी ही आदरणीय महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला. एक फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय तटरक्षक दलाचा चाळीसावा वर्धापन दिन असल्याचे सांगत मोदी यांनी तटरक्षक दलाच्या देशसेवेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी मोदी यांनी वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या परीक्षेचे दिवस असल्याने 'मन की बात'मध्ये मोदींनी परीक्षेसंदर्भात भाष्य केले. त्यातील काही प्रमुख मुद्दे :

  • परीक्षेचे दिवस म्हणजे तणावाचे दिवस मानले जातात. परीक्षेतील गुणांच्या मागे धावू नका.
  • गुणांवर नव्हे तर ज्ञानावर भर द्या.
  • परीक्षा म्हणजे तुमच्या एका वर्षाची चाचणी असते, संपूर्ण आयुष्याची नाही.
  • परीक्षेच्या काळात आराम, झोप, शारीरिक व्यायाम या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
  • मी पालकांना आवाहन करतो की त्यांना अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकारायला शिकायला हवे.
  • समस्येचे मूळ अपेक्षा हेच असते. आहे त्या गोष्टी स्वीकारल्याने सर्व गोष्टी सोप्या होतात.
  • परीक्षेत कॉपी करू नका. एकदा कॉपी करण्याची सवय लागली की तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाहीत.
  • इतरांशी स्पर्धा केल्याने तुम्ही दु:खी होता. स्वत:शी स्पर्धा करा. त्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल.
  • स्वत:शी स्पर्धा करताना सचिन तेंडुलकरचे उदाहरण घ्या. त्यांनी सलग 20 वर्षे स्वत:चेच विक्रम मोडीत काढले.
  • आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे जा. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.
Web Title: Narendra Modi's 'Man Ki Baat'