'मोदींच्या पाक मित्राने दहशतवाद्यांना भारताकडे सोपवावे'

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

भोपाळ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

दिग्विजयसिंह म्हणाले, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे आता मोदींच्या या मित्राने दोस्ती निभावण्यासाठी दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हफीज सईद या दहशतवाद्यांना त्वरीत भारताच्या ताब्यात द्यायला हवे. नुसती घोषणा करुन काय होणार आहे?'

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, 'मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे, हे चांगलेच झाले. परंतु हे खूप अगोदर व्हायला हवे होते. खूप दिवसांपासून हे ठरले होते. अखेर भारतात निवडणुकीच्या दरम्यान हे काम झाले. या घटनेचा निवडणुकीशी काही संबंध आहे की नाही हे मात्र मला माहीत नाही.'

दरम्यान, बुधवारी (ता. 1) संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरचा समावेश केला. पुलवाला हल्ला आणि भारतविरोधी अनेक कारवायांमध्ये मसूद अझहरचा हात होता. मात्र, मसूद अझहरला चीनचे समर्थन मिळत होते, यावेळी चीनने नमती भूमिका घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modis Pakistan Friend Imran Khan should handover terrorist india says digvijaysingh