श्रीमंत झोपेच्या गोळ्या शोधत आहेत- मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशात आणीबाणी लागू करून देशाला कारागृहात डांबले होते. आता हेच लोक मला प्रश्न विचारत आहेत. इंदिराजींच्या काळात आणीबाणीत देशाला त्रास झाला त्याचे उत्तर काँग्रेसने द्यावे.

गाझीपूर - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्याने आज गरिब नागरिक आरामात झोपत आहे. तर, श्रीमंतांना झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागत आहेत. गरिब आणि श्रीमंत समान पातळीवर आले आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) यांनी केले.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे गंगा नदीवरील पुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींनी नोटा बंदीच्या निर्णयावर भाष्य केले. तसेच त्यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. गाझीपूर येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी प्रचारसभा घेतली होती. आता पुन्हा एकदा ते येथे आले असून, त्यांनी काळ्या पैशावरून नागरिकांना आवाहन केले. 

मोदी म्हणाले, की भ्रष्टाचारी कधी पुढे येत नाहीत, ते मागून लोकांना भडकवत असतात. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशात आणीबाणी लागू करून देशाला कारागृहात डांबले होते. आता हेच लोक मला प्रश्न विचारत आहेत. इंदिराजींच्या काळात आणीबाणीत देशाला त्रास झाला त्याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. काँग्रेसने त्यांच्या कुवतीप्रमाणे चारआणे बंद केले. आम्ही पाचशे, हजारच्या नोटा बंद केल्या. दहशतवाद आणि बनावट नोटा रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी छोटा होतो तेव्हा लोक मला बोलायचे 'मोदीजी चाय जरा कडक बनाना'. आता मी कडक निर्णय घेतल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. तुम्ही सर्वांनी मला देशातील काळापैसा संपवण्यास सांगितला, मी आज जे केलंय त्यात माझं काय चूकल? कोणतही काम करताना आधी त्रास तर होतोच, देशाच्या भल्यासाठी हा निर्णय आहे. गरिबांच्या पैशाची लूट मी करू देणार नाही. रात्री गाड्या भरून बाहेर पडत आहेत आणि कचराकुंड्या, नदीमध्ये फेकण्यात येत आहेत. गंगेत नोटा टाकून तुमचे पाप धुतले जाणार नाही. नोटबंदीचा त्रास फक्त 50 दिवस होईल.

Web Title: narendramodi speaks at rally in Ghazipur, Uttar Pradesh