जया बच्चन यांच्यावरील टीकेनंतर आगरवाल यांना खेद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

नवी दिल्ली : समाजवादी पक्षातून भाजपमध्ये उडी घेताघेताच खासदार जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणारे भाजप नेते नरेश आगरवाल यांच्यावर भाजपसह सर्वपक्षीय महिला खासदारांनी चौफेर हल्ला चढविला. खुद्द भाजप व 'एनडीए'च्याही महिला नेत्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. इतका गोंधळ झाल्यावर आगरवाल यांनी आपल्या त्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला; मात्र माफी मागितली नाही. 

नवी दिल्ली : समाजवादी पक्षातून भाजपमध्ये उडी घेताघेताच खासदार जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणारे भाजप नेते नरेश आगरवाल यांच्यावर भाजपसह सर्वपक्षीय महिला खासदारांनी चौफेर हल्ला चढविला. खुद्द भाजप व 'एनडीए'च्याही महिला नेत्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. इतका गोंधळ झाल्यावर आगरवाल यांनी आपल्या त्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला; मात्र माफी मागितली नाही. 

आगरवाल यांनी काल भाजप प्रवेशावेळीच जया बच्चन यांच्याबद्दल अतिशय वाईट टिप्पणी केली होती. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल सायंकाळीच त्यांना कानपिचक्‍या दिल्या. पाठोपाठ स्मृती इराणी, हरसिमरत कौर बादल आदी महिला मंत्र्यांनीही आगरवाल यांचा निषेध केला. रेणुका चौधरी, रूपा गांगुली यांनीही त्याला जोड दिली. 

एवढा गोंधळ झाल्यावर व मुख्यतः सुषमा स्वराज यांनीच तलवार उपसल्यावर भाजप नेतृत्वाने गंभीर दखल घेऊन आगरवाल यांना कानपिचक्‍या दिल्या. त्यानंतर आज दुपारी आगरवाल यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, की माझ्या विधानाने कोणाला कष्ट झाले असतील तर मी खेद व्यक्त करतो. माझे विधान मी मागे घेतो. मात्र 'माफी' हा शब्द उच्चारण्यास त्यांनी कटाक्षाने टाळले. याबद्दल विचारले असता, 'खेद' व 'माफी' हे दोन वेगळे शब्द आहेत असे त्यांनी संबंधित पत्रकाराला सुनावले. 

याबाबत स्मृती इराणी यांनी सांगितले, की कोणत्याही महिलेच्या सन्मानाचा मुद्दा असतो तेव्हा पक्षाचा विचार न करता सर्व महिला लोकप्रतिनिधींनी तिच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. यापूर्वी कॉंग्रेसचे संजय निरूपम यांनीही स्मृती इराणींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते व त्याबद्दल स्मृती इराणी यांनी त्यांना न्यायालयात खेचले आहे. त्याबद्दल त्या म्हणाल्या, की तो मुद्दा न्यायप्रविष्ट आहे व दोन्हींची तुलना करणे अयोग्य ठरेल. रूपा गांगुली यांनी सांगितले, की जया बच्चन यांचे चित्रपटातील योगदान अपूर्व आहे. जयाजी, आम्ही तुमचा सन्मान करतो. 

रेणुका चौधरी म्हणाल्या, की आगरवाल यांना जया बच्चन यांची माहिती नाही. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करण्यापूर्वीच जया भादुरी म्हणून चित्रपटांत मोठे यश मिळविले होते. पण या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या आगरवाल यांना हे कसे कळणार? हरसिमरत कौर यांनी आगरवाल यांच्या विधानाची तुलना रोडसाईड रोमिओशी केली. 

मी जिद्दी आहे : जया बच्चन 
खुद्द जया बच्चन यांनी यावर बोलण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, की मी अतिशय जिद्दी आहे. यावर मी काहीही बोलणार नाही. जया बच्चन यांना समाजवादी पक्षाने राज्यसभेचे तिकीट पुन्हा दिले असून त्यावरूनच आगरवाल चिडले आहेत. 

Web Title: Naresh Agarwal Jaya Bachchan Samajwadi Party BJP