अटलजींना राष्ट्राने वाहिली आदरांजली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 August 2019

-  "मैं जी भर के जिया, मैं मन से मरूँ' असे सांगत सांगत वर्षभरापूर्वी या इहलोकाचा निरोप घेतलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आज आदरांजली वाहण्यात आली.

- यानिमित्त दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

नवी दिल्ली : "मैं जी भर के जिया, मैं मन से मरूँ' असे सांगत सांगत वर्षभरापूर्वी या इहलोकाचा निरोप घेतलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरात आज आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

राष्ट्रपती रमनाथ कोविंद, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदींनी सकाळीच राजघाटावर जाऊन अटलजींना आदरांजली अर्पण केली. 

गेली सुमारे 12 वर्षे प्रकृती अस्वासथ्यामुळे वाजपेयी सार्वजनिक जीवनापासून पूर्ण दूर होते. वयाच्या 93 व्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 16 ऑगस्टला सायंकाळी पाचच्या सुमारास एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यानंतर मोदी सरकारने राजघाट परिसरात "सदैव अटल' या कमलाकृती समाधीस्थळाची निर्मिती केली. मागील वर्षी अटलजींच्या वाढदिवशी (ता.25 डिसेंबर) हे समाधीस्थान जनतेसाठी खुले करण्यात आले. याठिकाणी काळ्या रंगाच्या ग्रॅनाईटमध्ये अटलीजंची समाधी आहे. या ठिकाणी आज सकाळपासून अटलजींचे चाहते आणि भाजप नेते तसच कार्यकर्त्यांची वर्दळ होती.

अटलजींच्या कन्या नमिता, जावई आणि नात यांनीही सकाळीच अटलजींना आदरांजली वाहिली. यानिमित्त भक्तीसंगीताच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अटलजींच्या सहवासात आलेल्यांपासून तरूण पिढीतील अनेकजणांनीही आज दिवसभर येथे येऊन या राष्ट्रनेत्याला आदरांजली अर्पण केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nation paid tribute to Atalji