तरुणीच्या ब्लॅकमेलिंगमुळे भय्यू महाराजांची आत्महत्या?

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका तरुणीमुळे भय्यू महाराजांनी टोकाचं पाऊल उचलल्याची आता चर्चा आहे.

इंदूर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागणार आहे. ब्लॅकमेलिंग करणाऱ्या एका तरुणीमुळे भय्यू महाराजांनी टोकाचं पाऊल उचलल्याची आता चर्चा आहे. भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली. यावेळी भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप या दोघींनी केला आहे.

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.

भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावाही आयुषी आणि कुहू यांनी केला आहे. ब्लॅकमेलिंगमुळे विवंचनेत असलेल्या भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा संशय दोघींनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेला पूर्वीचा ड्रायव्हर कैलास पाटील याला सर्व कटकारस्थानाची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला आहे.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली होती. त्याच्या दुसऱ्या पानावर 'माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा', असा उल्लेख आहे. भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता.

Web Title: national bhaiyyu maharaj suicide case wife aayushi daughter kuhu demand driver statement should recorded in court

टॅग्स