हवाई दलातील कॅप्टनला हेरगिरी प्रकरणात अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

भारतीय सुरक्षा दलांतील अधिकाऱ्यांना "हॅनी ट्रॅप'मध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचे कारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात आले. हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असलेले अरुण मारवा डिसेंबरमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्‌सच्या माध्यमातून दोन तरुणींच्या संपर्कात आले.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या "हनी ट्रॅप'मध्ये अडकून हवाई दलातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा "आयएसआय'ला देणाऱ्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. ग्रुप कॅप्टन अरुण मारवा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. 

भारतीय हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने सुमारे 10 दिवस चौकशी केल्यानंतर मारवा यांना विशेष शाखेच्या उत्तर विभागाकडे सोपविण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कायद्याखाली अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले. 

भारतीय सुरक्षा दलांतील अधिकाऱ्यांना "हॅनी ट्रॅप'मध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचे कारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात आले. हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असलेले अरुण मारवा डिसेंबरमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्‌सच्या माध्यमातून दोन तरुणींच्या संपर्कात आले. त्या तरुणींनी मॉडेल असल्याचे भासवत संपर्क वाढवला. काही दिवसांनी त्या तरुणींनी अश्‍लील भाषेत संवाद साधायला सुरवात केली. मारवा त्यांच्या जाळ्यात अडकताच त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढून घेण्यात आली. किरण रंधवा आणि महिमा पटेल अशी या दोन अकाऊंट वरील नावे असल्याचे उघडकीस आले आहे. 

मारवा यांच्याशी ज्या प्रोफाईलवरुन संपर्क साधण्यात आला ते प्रोफाईल खोटे असल्याचा संशय आहे. आयएसआयच्या अधिकाऱ्यांनीच ते तयार केले असावे अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. या सर्व प्रकाराची हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, 31 जानेवारीला मारवा यांच्या चौकशीला सुरवात झाली. 
दिल्ली पोलिसांनी अरुण मारवा यांना अटक केली असून त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. 

हवाई दलाने मारवा यांच्या विरोधात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, मुख्यालयात बंदी असतानाही मारवा हे एक उच्च तंत्रज्ञानयुक्त स्मार्टफोन हाताळत असल्याचे आढळून आल्यानंतर गुप्तचर विभागाने त्यांना पकडले. मारवा अन्य एखाद्या मोठ्या हेरगिरी वर्तुळाचा भाग आहेत का, याचीही चौकशी गुप्तचर विभाग करत आहे. हवाई दलाने या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

हे आहेत आरोप... 
हवाई दलाच्या मुख्यालयात कार्यरत असताना अरुण मारवा यांनी गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढून "व्हॉट्‌सऍप'द्वारे एका महिलेला पुरविल्याचा आरोप आहे. हवाई दलातील प्रशिक्षण आणि युद्धाशी संबंधित सराव याबद्दलची माहिती त्यांनी पुरविल्याचे सांगितले जाते. या महिलेशी त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फेसबुकद्वारे मैत्री केली होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गोपनीयतेच्या कायद्यानुसार अशा प्रकरणातील दोषीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

Web Title: National news Air Force Officer Arrested In Delhi Seduced By ISI Spies On Chat