आमदार वाढवा; सीमालढ्याचा दावा बळकट होईल - शरद पवार

बेळगाव - येथे जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
बेळगाव - येथे जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

बेळगाव - ‘पस्तीस लाख मराठी जनतेचा सीमालढा रस्त्यावरून सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी ऐतिहासिक पुरावे, कायदेशीर तयारीही झाली आहे. पण, दाव्याला मजबुती येण्यासाठी मराठी जनतेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे लागतील, असे सांगत असतानाच सीमालढ्यात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सातत्याने लढा दिला आहे. यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृतिशील राहा. आम्ही दिल्लीत गप्प बसणार नाही याची खात्री देतो.’ अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमावासीयांना दिली.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शनिवारी (ता. ३१) सीपीएड मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सीमावासीयांचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, सीमासंघर्षात तीन-चार पिढ्यांनी योगदान दिले आहे. भाषा आणि अस्मितेसाठी लढणाऱ्यांना, हौतात्म्य पत्करलेल्यांसमोर नतमस्तक होण्याचा हा प्रसंग आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना करून नवीन राज्ये उदयास आली. एकाच भाषेच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी पावले टाकण्यात आली. पण काही भाग मातृभूमीपासून वेगळाच राहिला. त्यात सीमाभागाचा समावेश आहे. मी सर्व भाषांचा आदर करतो. पण, हेच सूत्र बाकीच्यांनीही स्वीकारले पाहिजे. कर्नाटक माझा भाऊ आहे. छत्रपती शिवरायांचे कुटुंबीय कर्नाटकातील काही भागात होते. हिंदवी स्वराज्याचे नेतृत्व करणाऱ्या छत्रपतींनी भाषेच्या बाबतीत अशी संकुचित मर्यादा घालून घेतली नव्हती. महाराष्ट्र नेहमीच कर्नाटकच्या हिताची जपणूक करत आला आहे.’

कर्नाटकला पाणी दिले
‘मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कर्नाटकातील काही मंत्री पाण्यासाठी आपल्याकडे आले होते. आमच्या अधिकाऱ्यांनी कोयनेत पाणी कमी असल्याचे सांगितले. तरीही शेजारधर्म पाळण्यासाठी मी पहिल्यांदा कर्नाटकला पाणी सोडले. स्वातंत्र्याच्या आधी अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या उपस्थितीत भाषावार प्रांतरचनेचा ठराव करण्यात आला होता. ठरावाची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी मात्र सीमाभाग मागे पडला. त्यामुळेच ३०-३५ लाखांचा हा सीमाभाग अस्वस्थ राहिला आहे.’ अशी खंत श्री. पवार यांनी व्यक्‍त केली.

मी सीमावासियांसोबतच
‘१९४६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करण्यात आली. मराठी जनतेला एकत्र करून एका व्यासपीठावर आणावे, हा यामागचा हेतू होता. आजपर्यंत सीमाभाग महाराष्ट्रात आला नाही. सत्याग्रह, आंदोलन, हौतात्म्य, तरूणाईला कारावास, मोर्चा, सभा, साराबंदी झाली. पण, न्याय मिळत नाही. या प्रश्‍नावर मी सीमावासियांसोबत असून देशपातळीवर हा प्रश्‍न न्यायचा असेल तर बेळगावकरांचे काय म्हणणे आहे, याचा विचार आधी होतो. तशी तयारी तुम्हाला करावी लागेल.’ असे ते म्हणाले.

मताचा आदर करा
लोकशाहीत लोकांच्या मताचा आदर करावा लागतो. सीमावासियांनी विधानसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत उमेदवार निवडून दिले आहेत. ती एक संधी असते. राज्यकर्त्यांना त्याचा आदर करावा लागतो. सीमावासियांनी अनेकदा मतदानातून आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत. आज तीच भूमिका पुन्हा स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, अशी सूचना त्यांनी केली.

सामान्य माणूस प्रामाणिक
समितीच्या हिताची जपणूक करताना सामान्य माणूस प्रामाणिक राहिला आहे. तो कशाचीही अपेक्षा करत नाही. मी माझ्या मराठी बांधवांसमवेत राहण्याची संधी शोधत असतो. ती संधी जवळ आली आहे. पन्नास वर्षे मी समितीच्या पाठीशी आहे. आता या शेवटच्या टप्प्यात कोणत्या दिशेने जायचे, अशी विचारणा बिदर, भालकी भागातूनही होत आहे. त्यामुळे सर्व मतभेद गाडून एकत्र जावे लागणार आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी लढ्यात सुरवातीपासूनच योगदान दिले आहे. त्यामुळे, ते जे सांगतील तशी कृती करावी लागणार आहे. आम्हीही दिल्लीत गप्प बसणार नाही, याची मी खात्री देतो, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, मध्यवर्ती व शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, आमदार अरविंद पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार निवेदिता माने, धैर्यशील माने, उपमहापौर मधुश्री पुजारी, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, सुभाष ओऊळकर, माजी सनदी अधिकारी दीपक ओऊळकर, कॉ. कृष्णा मेणसे, ॲड. राम आपटे, ॲड. किसन येळ्ळूकर, माजी आमदार दिगंबर पाटील, जयराम मिरजकर, किरण ठाकुर आदी उपस्थित होते. निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी सूत्रसंचालन केले. मालोजी अष्टेकर यांनी आभार मानले.

लढ्याची वाटचाल जिद्दीने
सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात दाखल होऊन चौदा वर्षे झाली. गेल्यावेळी फंदफितुरीने समितीचे दोन उमेदवार पाडण्यात आले, तरी आम्ही अस्वस्थ नाही. जिद्दीने लढ्याची वाटचाल सुरू आहे. पाच जागा नाहीत, ही आमची खंत असली तरी इच्छाशक्‍ती कायम आहे. कोणतीही किंमत मोजायची तयारी आहे. त्यामुळे पुढच्या वेळी शरद पवारांना पाच आमदारांचा सत्कार करायला बेळगावात यावे लागेल, अशी ग्वाही सीमालढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात दिली.

ते म्हणाले, ‘शरद पवार यांनी सीमाप्रश्‍नी वारंवार महत्त्वाची मदत केली आहे. न्यायालयीन लढ्यासाठी चांगल्यात चांगले वकील मिळवून दिले. सीमावासी ऋणी राहतील, अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांनी देशाला तेजस्वी पर्व दिले आहे. त्यांचे आमच्यासोबत असणे ही मोठी ताकद आहे.’ असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com