चीनच्या पथकाची अरुणाचलमध्ये घुसखोरी

पीटीआय
गुरुवार, 4 जानेवारी 2018

इटानगर, नवी दिल्ली - चीनच्या रस्ते बांधणी पथकाने अरुणाचल प्रदेशातील तुतिंग भागात भारतीय हद्दीत एक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. भारतीय सैनिकांनी त्यांना विरोध केल्यानंतर हे पथक परत गेल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. 

इटानगर, नवी दिल्ली - चीनच्या रस्ते बांधणी पथकाने अरुणाचल प्रदेशातील तुतिंग भागात भारतीय हद्दीत एक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. भारतीय सैनिकांनी त्यांना विरोध केल्यानंतर हे पथक परत गेल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. 

चीनच्या रस्ते बांधणी पथकात काही सर्वसामान्य नागरिक आणि लष्करी गणवेशातील काही जणांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. भारतीय सैनिकांनी त्यांना रोखल्यानंतर ते सर्व जण त्यांच्याकडील उपकरणे जागेवरच सोडून परत गेले. ही घटना २८ डिसेंबरला घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिक्कीममधील वाद संपुष्टात आल्यानंतर ७३ दिवसांनी पुन्हा एकदा चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या गस्ती पथकाला भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतमध्ये काही चिनी नागरिक रस्त्यासाठी मोजमाप करत असल्याचे दिसून आले; मात्र या वेळी कोणताही संघर्ष झाला नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीनुसार हा प्रश्न सोडविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चीनच्या सीमेच्या जवळ असलेल्या झिडो गावातील न्योमिन आणि गेलिंग गावातील पेमा न्यिसिर या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठिकाणी रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सियांग नदीच्या किनाऱ्यावरूनही या घडामोडी दिसू शकत होत्या.

गावातील नागरिकांनी या घडामोडींची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ती माहिती मेडॉग येथील आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांना दिली. आयटीबीपीचे जवान घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी चिनी नागरिकांना माघीरी फिरण्यास सांगितले. या वेळी बाचाबाचीही झाली. त्यानंतर भारतीय लष्कराचे गस्तीपथकही घटनास्थळी दाखल झाले. 

याबाबत अपर सियांगचे जिल्हाधिकारी दुली कामदुक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चीनच्या घुसखोरीची माहिती तुतिंग येथील अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली नाही. 

राज्याच्या मुख्य सचिवांनीही घुसखोरी झाल्याची माहिती नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: national news chinese soldiers entered one km inside in arunachal pradesh