भाजपच्या पराभवासाठी 'सप'ला मदतीची मायावतींची घोषणा 

Mayawati
Mayawati

नवी दिल्ली : ईशान्य भारतात भाजपने मुसंडी मारल्यानंतर हादरलेले विरोधक एकत्र येण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. याची चुणूक उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज दिसून आली. एकमेकांचे हाडवैरी असलेल्या बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्षाने (सप) "देवाण-घेवाणी'च्या व्यवहार्य मोबदल्यात हातमिळवणी केली आहे. तर त्यांच्यासोबत जाणे कॉंग्रेसलाही अपरिहार्य आहे. यामुळे राष्ट्रीय राजकारणावरही याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. 

उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फूलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवासाठी "सप'ला मदत करण्याची घोषणा मायावती यांनी आज केली. याच्या मोबदल्यात "सप'कडून "बसप'ला राज्यसभा निवडणुकीसाठी अतिरिक्त मतांची कुमक मिळणार असल्याने वरिष्ठांचे सभागृह असलेल्या राज्यसभेत जाण्याचा "बहेनजीं'चा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये कॉंग्रेसकडूनही मायावतींना उत्तर प्रदेशात मदत अपेक्षित आहे. त्याची परतफेड "बसप'चे आमदार मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मते देऊन करणार आहेत. 

"बसप' नेत्या मायावती यांनी आज या मदतीची घोषणा करताना संदिग्ध भाषा वापरत यातून फारसे राजकीय अर्थ काढले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. मात्र ही "सप' आणि "बसप'च्या मैत्रीची नांदी असल्याचे मानले जाते. एकेकाळी एकत्रित सरकार चालविणारे "सप' आणि "बसप' एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या दोन तपांपासून हे शत्रुत्व सुरू असताना अचानक मायावतींनी घेतलेली व्यवहारवादी भूमिका राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारी आहे. 

मुलायमसिंहांना मायावतींचा तिटकारा असल्याने "सप' आणि "बसप'मध्ये शत्रुत्व होते. परंतु अखिलेश यादव "सप'चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी दोन्ही पक्षांच्या मैत्रीचे सूतोवाच केले होते. आता ही मैत्री वास्तवात उतरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष 
दरम्यान, यात कॉंग्रेसच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची ताकद अत्यंत क्षीण असली तरी "सप' आणि "बसप'ला सोबत घेतल्यास तिन्ही पक्षांच्या एकत्रित मतांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवर जाते. त्यामुळे महाआघाडी करावी आणि भाजपला 2019च्या लोकसभा निवडणुकीत रोखावे, असा कॉंग्रेसचा आग्रह आहे. राज्यातील 30हून अधिक जागांवर परिणामकारक मुस्लिम मते, "सप'ची "ओबीसी' मतपेढी आणि मायावतींचे दलित मतदार या जोरावर भाजपला धोबीपछाड देता येईल, असा कॉंग्रेसचा होरा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com