गुजरात तरले, हिमाचल जिंकले

वृत्तसंस्था
सोमवार, 18 डिसेंबर 2017

कॉंग्रेसची कडवी झुंज; सत्त्व परीक्षेत राहुल उत्तीर्ण

कॉंग्रेसची कडवी झुंज; सत्त्व परीक्षेत राहुल उत्तीर्ण
अहमदाबाद/ शिमला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या गुजरात विधानसभेच्या रणसंग्रामात भाजपने आज विजयी षट्‌कार ठोकत 99 जागांवर विजय मिळवला खरा, पण बहुमतासाठीचे 92 एवढे संख्याबळ गाठताना पक्षाची पुरती दमछाक झाली. कॉंग्रेसने येथे कडवी लढत देत 79 जागा भाजपच्या ताब्यातून अक्षरश: हिसकावून घेतल्यामुळे मागील सलग 22 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला कसेबसे गुजरात राखण्यात यश आले आहे.

हिमाचल प्रदेशात भाजप 44 जागांवर विजयी झाला असला तरी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्याने येथे पक्षाची अवस्था येथील "गड आला पण बुरूज ढासळला' अशी झाली.

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर पहिल्या फेरीतील कौल हे कॉंग्रेसच्या बाजूने होते, यामुळे भाजप नेत्यांची धाकधूक वाढली होती. निवडणुकीचा कौल स्पष्ट होत नाही तोवर फटाके फोडू नका असे स्पष्ट आदेशच हायकमांडने कार्यकर्त्यांना दिले होते.

सकाळी दहानंतर चित्रच पालटले भाजपने 83 जागांवर आघाडी घेतली तर त्याचवेळी कॉंग्रेसचे उमेदवार 62 ठिकाणी आघाडीवर होते. कॉंग्रेस आघाडी घेत असल्याचे दिसून येताच नेत्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती करायला सुरवात केली, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. सकाळी अकराच्या सुमारास भाजपने 99 जागांवर आघाडी घेतल्याने "जित के सौदागर' कोण हे स्पष्ट झाले आणि कॉंग्रेस मुख्यालयावर पराभवाचे ढग दाटून आले. दुसरीकडे गांधीनगरमध्ये भाजपचे मुख्यालय असणाऱ्या "कमलम' येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटायला सुरवात केली. भाजपचा वारू 99 जागांवर पोचला खरा, पण त्यांचे विजयाचे शतक मात्र हुकले.

पटेलांच्या बालेकिल्ल्यात फटका
पटेलांचे वर्चस्व असलेल्या 83 मतदारसंघांमध्ये भाजपला केवळ 24 ठिकाणांवर आघाडी मिळाली आहे. तत्पूर्वी 2012 मध्ये येथे भाजपने 59 म्हणजे 71 टक्के जागा जिंकल्या होत्या. हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसशी केलेल्या हातमिळवणीमुळे येथे भाजपला फटका बसल्याचे बोलले जाते. राज्यसभा निवडणुकीप्रसंगी कॉंग्रेसमधून भाजपच्या गोटात दाखल झालेले बहुसंख्य आमदार याखेपेस पराभूत झाले तर भाजपच्या अर्ध्या डझनपेक्षाही अधिक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शहरांचा भाजपला "हात'
मध्य, दक्षिण आणि उत्तर गुजरातने भाजपच्या बाजूने कौल दिला असून सौराष्ट्र-कच्छचा जनादेश कॉंग्रेसच्या बाजूने आहे. नेहमीप्रमाणे याखेपेसही शहरी भागाने भाजपला साथ दिली तर ग्रामीण भागामध्ये कॉंग्रेसला "अच्छे दिन' आले आहेत. शहरांत भाजपची संघटन यंत्रणा मजबूत असल्याने याचा मोठा फायदा पक्षाला झाला. विशेष म्हणजे मोदींनी ज्या भागांमध्ये प्रचार केला तेथे भाजपला विशेष फायदा झाला नसून उलट नुकसानच सहन करावे लागले आहे. वस्तू व सेवा कराविरोधातील आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या हिरेनगरी सुरतमध्येही कमळ फुलल्याने आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

हिमाचलमध्ये "कमलराज'
हिमाचल प्रदेशातील सत्ताबदलाचा इतिहास यावेळेसही कायम राहिला, येथे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले असले तरी जनतेने विजयाचे माप मात्र भाजपच्या पारड्यात टाकले. याखेपेस हिमाचल प्रदेशातील जागांबरोबरच भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाणही वाढले आहे. राज्यातील अर्की, सुजाणपूर, शिमला ग्रामीण आणि पालमपूर या चारही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. धुमल यांच्या पराभवामुळे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जे. पी. नड्डा यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. तसे खुद्द पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सूचित केले आहे.

Web Title: national news narendra modi gujarat election bjp verdict congress ahul gandhi