नितीन पटेलांच्या नाराजीचे दिल्लीतही धक्के

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

दरम्यान, पटेल यांची नाराजी व त्यातून मिळणारा सरकारच्या अस्तिरतेबाबतचा संदेश पाहता संघही या संकटाच्या निवारणासाठी सक्रिय झाला आहे. मोदी यांचा शब्द प्रमाण मानणारे पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्याच्या असंतोषाला अशी वाट करून देणे हे भाजपमध्ये आश्‍चर्याचे मानले जाते. मात्र भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुासर नितीन पटेल हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते बंडाचा विचारही करू शकत नाहीत

नवी दिल्ली - गुजरातचे उपमुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासातील मानले जाणारे नितीन पटेल यांनी नव्या मंत्रिमंडळात मनासारखी खाती न मिळाल्याने उघडपणे केलेली बंडाची भाषा भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. पटेल यांना पाहिजे त्या 3 पैकी किमान दोन खाती त्यांच्याकडे द्यावीच लागणा,ह्हिे निश्‍चित असून येत्या सोमवारपर्यंत हा पेच निवळण्याचा विश्‍वास भाजपमधून बोलून दाखविला जातो.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातेतही 2014 इतक्‍या जागा मिळविणे भाजपसाठी शक्‍य दिसत असताना पटेल यांच्या उघड नाराजीने नवी ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही धोक्‍याची घंटा मानली जाते. दुसरीकडे कॉंग्रेसने हार्दिक पटेल याच्या माध्यमातून पटेल यांच्या नाराजीचा राजकीय फायदा उचलण्याची धडपड चालविल्याने भाजप नेतृत्व अधिकच सावध झाले असून, नितीन पटेलांशी तातडीने संपर्क साधण्यात आला आहे. दरम्यान, गेली दीड-दोन वर्षे पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाते तथापि मोदी नव्हे, तर भाजप नेतृत्वामुळेच आपल्याला ते पद मिळालेले नसल्याची भावना पटेल यांची नाराजी वाढविणारी ठरली आहे. मोदी किंवा विजय रूपानींपेक्षा त्यांचा सर्वाधिक रोष भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरच असल्याचेही दिल्लीत बोलले जाते.

पटेल यांची रातोरात समजूत काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर स्वतः पंतप्रधानांना यात उडी घ्यावी लागली आहे. पटेल यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यासही नकार दिला होता. ते व शहा यांच्यातील वाद प्रचंड वाढला असून, तो हाताबाहेर जाण्याची स्थिती असल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. गुजरात हे आगामी काळात मोदींसाठी डोकेदुखीचे राज्य ठरण्याची शक्‍यता पटेल यांच्याबाबतच्या घटनाक्रमातून व्यक्त होते. मोदी यांनी दिल्लीत आल्यावर तेथे प्रथम आनंदीबेन पटेल व नंतर रूपानी यांना मुख्यमंत्री केले तोवर पटेल गप्प राहिले. मात्र आत त्यांना हवी ती खातीही देण्यास दिल्लीतील भाजप मुख्यालयातून टाळाटाळ सुरू झाल्यावर ते भडकले व त्यांच्या असंतोषाला काल वाचा फुटली. त्यांच्या समर्थक किमान 12 आमदारांनी अहमदाबादेत काल रात्रीपासून बैठकाही सुरू केल्याने भाजप नेतृत्वाचे धाबे दणाणले व मोदींचा धावा सुरू झाला.

राजकीय संकटात संघाचीही उडी
दरम्यान, पटेल यांची नाराजी व त्यातून मिळणारा सरकारच्या अस्तिरतेबाबतचा संदेश पाहता संघही या संकटाच्या निवारणासाठी सक्रिय झाला आहे. मोदी यांचा शब्द प्रमाण मानणारे पटेल यांनी मनासारखी खाती न मिळाल्याच्या असंतोषाला अशी वाट करून देणे हे भाजपमध्ये आश्‍चर्याचे मानले जाते. मात्र भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुासर नितीन पटेल हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते बंडाचा विचारही करू शकत नाहीत. काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल व सोमवारपर्यंत हा पेच निवळेल.

Web Title: national news nitin patel bjp Gujrat