'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या 23 वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची ती राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्येच गोळ्या घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागे तिचा प्रियकर असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नोएडा : एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या 23 वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची ती राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्येच गोळ्या घालून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागे तिचा प्रियकर असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठातून पदवी घेतलेली अंजली राठौड (वय 23) नोएडातील सेक्‍टर 62 मध्ये राहात होती. सेक्‍टर 62 मधील शताब्दी रेल विहार सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर इतर सहा मुलींसोबत अंजली राहात होती. मूळ हरियानातील यमुना नगरमधील असलेली अंजली जून 2016 पासून नोएडामध्ये नोकरी करत होती. बुधवारी सकाळी अंजलीच्या प्रियकराने तिला फोन केला. त्यानंतर अंजली तळमजल्यावर आली. तेथेच काही वेळाने ट्युशनला जाणाऱ्या अंजलीच्या रूममेटला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. त्यानंतर तातडीने अंजलीला फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार चित्रित झाला आहे. पोलिसही आणि तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 'आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून प्राथमिक तपासाअंती या हत्येमागे अंजलीचा प्रियकर असण्याची शक्‍यता आहे. आम्ही त्याला लवकरच अटक करणार आहोत', अशी माहिती नोएडाचे पोलिस अधिक्षक अरुण कुमार सिंह यांनी दिली.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अंजलीच्या मागून येणाऱ्या एका व्यक्तीने हत्या केल्याचे दिसत आहे. मात्र कॅमेऱ्याची गुणवत्ता चांगली नसल्याने प्रतिमा अस्पष्ट दिसत आहेत.

Web Title: national news noida news anjali murder india news breaking news marathi news it engineer murder