गुजरातमधील नाराजीनाट्य संपेना

गुजरातमधील नाराजीनाट्य संपेना

अहमदाबाद - गुजरातमध्ये खातेवाटपावरून प्रस्थापित नेत्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला असून, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यानंतर आता राज्याचे मत्सोद्योगमंत्री पुरुषोत्तम सोळंकी यांनी वेगळ्या मंत्रालयाची मागणी केली आहे. सौराष्ट्रातील कोळी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सोळंकी यांनी खातेवाटपावरून मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री रूपानी यांच्याकडे बारा महत्त्वाची खाती आहेत. ही खाती त्यांनी अडवून ठेवली असून, आपल्यालाही एखादे चांगले खाते दिले जावे, असे सोळंकी माध्यमांशी बोलताना म्हणाले. आपल्या मनातील राग व्यक्त करण्यासाठी आज त्यांनी गांधीनगरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहणे टाळले. पाच वर्षांपासून मी आमदार असताना मला दुय्यम दर्जाचे खाते देण्यात आले. यामुळे कोळी समुदायात मोठा असंतोष आहे. अनेकांनी तर मला राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे आपल्याला कोणते मंत्रालय हवे, हे सांगणे मात्र त्यांनी टाळले आहे. पण त्यांचा डोळा पेट्रोकेमिकल सारख्या खात्यांवरच असल्याचे दिसते.

समाजाची नाराजी
मागील वेळेस आपण अनेक मंत्रालये सांभाळली असून, सलग पाच वेळेस मी विजय संपादन केला आहे. या वेळेस मात्र मला केवळ मत्सोद्योग खाते देण्यात आले. हे मला स्वीकारार्ह नाही. माझ्या या भूमिकेवर समाजदेखील नाराज आहे, असे सोळंकी यांनी सांगितले. मागील वेळेस सोळंकी यांच्याकडे कामगार आणि रोजगार, पशुपालन आणि गो-संगोपन ही खाती सोपविण्यात आली होती. या वेळेसही त्यांना महत्त्वाची खाती दिली जातील असे वाटत होते. 

लवकरच फेरबदल
मंत्रिमंडळातील वाढता असंतोष लक्षात घेता मुख्यमंत्री विजय रूपानी हे मंत्रिमंडळात मोठा फेरबदल घडवून आणण्याची शक्‍यता आहे. फेब्रुवारीमधील राज्य अर्थसंकल्पापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता आहे. भाजप सरकार पाच ते सात संसदीय सचिवांचीही नेमणूक करू शकते. दरम्यान, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर करणारे राज्याचे शिक्षणमंत्री भूपिंदरसिंह चुडासामा यांनी आज सोळंकी यांची भेट घेतल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com