सरकार काँग्रेसचे अथवा मोदीमुक्त आघाडीचे: राहुल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

गांधी यांनी गुजरात निवडणुकीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण झाल्याचे आढळून येत असल्याचे सांगितले. लहानसहान मतभेद बाजुला ठेवून एकजुटीने प्रथम वर्तमान राजकीय आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात स्पष्ट भावना निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आपल्याला आगामी निवडणुकीत चांगले यश मिळेल असा विश्‍वास आहे, असेही त्यांनी म्हटले.

नवी दिल्ली : आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर केंद्रात कोणते सरकार येईल? कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मते दोन शक्‍यता आहेत. एकतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार येईल किंवा "नरेंद्र मोदी वजा भाजप आघाडीचे सरकार' येऊ शकते! कॉंग्रेसच्या संख्याबळात लक्षणीय वाढ होण्याचे भाकितही त्यांनी वर्तविले. 
संसदेत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना वर्तमान राजकीय परिस्थितीबद्दल विश्‍लेषण करताना त्यांनी वरीलप्रमाणे त्यांचे राजकीय आकलन सादर केले. ते म्हणाले, ""आगामी निवडणुकीत कॉंग्रेसच्या संख्याबळात निश्‍चितपणे अगदी कमीतकमी आकडा मान्य केला तरीही किमान साठ ते सत्तर जागांची वाढ होणे अपेक्षित आहे. एवढ्या वाढीव जागा आमचा पक्ष निश्‍चित जिंकेल. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, हरियाना, गुजरात या राज्यांतून कॉंग्रेसला वाढीव जागा मिळतील.'' 

भाजपसंदर्भात ते म्हणाले, "कॉंग्रेसच्या ज्या साठ ते सत्तर जागा वाढतील त्या मुख्यतः भाजपच्या असतील. तेवढ्या जागा भाजपच्या सध्याच्या संख्याबळातून वजा केल्यास भाजपचे संख्याबळ 210 च्या आसपास राहील. या कमी संख्याबळामुळे भाजपच्या मित्रपक्षांचा त्यांच्या आघाडीवर वरचष्मा राहील आणि त्या परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वाला आव्हान दिले जाऊ शकते आणि एकंदर चिन्हे लक्षात घेता भाजप आघाडीतील घटकपक्ष मोदींचे नेतृत्व पुन्हा मान्य करतील अशी शक्‍यता दिसत नाही. त्याऐवजी ते भाजपच्या इतर कोणत्यातरी नेत्याची नेतृत्वासाठी निवड करू शकतात. म्हणजेच आगामी निवडणुकीत भाजप व त्यांच्या आघाडीला सरकारस्थापनेची संधी मिळाली तरी ते सरकार "मोदी-वजा' किंवा "मोदी-मुक्त' असेल असा अंदाज आहे.'' 

गांधी यांनी गुजरात निवडणुकीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण झाल्याचे आढळून येत असल्याचे सांगितले. लहानसहान मतभेद बाजुला ठेवून एकजुटीने प्रथम वर्तमान राजकीय आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात स्पष्ट भावना निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आपल्याला आगामी निवडणुकीत चांगले यश मिळेल असा विश्‍वास आहे, असेही त्यांनी म्हटले. गुजरातची निवडणूक हे कॉंग्रेसपुढील एक मोठे व अवघड आव्हान मानले जात होते. परंतु कॉंग्रेसने तेथे ज्या पद्धतीने लढत दिली, त्यामुळे कॉंग्रेसला सरकार स्थापनेची संधी मिळाली नसली तरी आणि पराभव होऊनही पक्ष जिंकल्याची भावना व चित्र सर्वत्र निर्माण झाले होते आणि तीच मालिका पुढे चालू राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी कर्नाटकात भाजपतर्फे हिंदुत्व "कार्ड' खेळले जाईल असे मतही व्यक्त केले.

Web Title: National news Rahul Gandhi statement on Modi Government