पच्चीस साल बाद... चिठ्ठी आया है 

Rajnikanth
Rajnikanth

चेन्नई : राजकीय कुरघोडीमध्ये भरडल्या जाणाऱ्या तमिळनाडूसाठी रजनीकांत हे आशेचा किरण ठरू शकतात का? दक्षिणेतील राजकीय पोकळी भरून काढण्याची क्षमता रजनीकांत यांच्याकडे आहे का? तमिळी राजकारणाच्या व्यासपीठावरून "द्रमुक' आणि "स्टॅलिन' यांना ते खाली उतरवू शकतात का, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे आता लवकरच मिळतील. 

हो- नाही करत रजनीकांत 25 वर्षांनंतर सक्रिय राजकारणात आले. खरंतर 1996 मध्येच त्यांची बस चुकली होती. कारण, तेव्हा त्यांच्या राजकीय प्रवेशासाठी सर्वाधिक अनुकूल स्थिती होती, असे राजकीय जाणकार सांगतात. 

नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या मूपनार यांनी रजनी यांना राजकीय प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. रजनी यांचे तेव्हाच्या राजकारणातील जवळचे मित्र चो रामास्वामी यांनीही त्यांना नैतिक पाठिंबाही दिला होता; पण चित्रपटामुळे रजनीअण्णांना माघार घ्यावी लागली. यानंतर रजनीकांत यांना राजकारणात येण्यासाठी दोन दशके वाट पाहावी लागली. तमिळनाडूच्या राजकीय क्षितिजावरून द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचा सूर्य अस्त पावू लागला असून, अण्णा द्रमुक गटातटांमध्ये विभागला गेला आहे. विजयकांत यांचा "डीएमडीके' अंधारात चाचपडताना दिसतो अशा स्थितीमध्ये रजनीकांत मोठी बाजी मारू शकतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी चाहत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरवात केल्यानंतर अनेकांना तो "कबाली' या चित्रपटासाठीचा पब्लिसिटी स्टंट वाटत होता. पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले त्यांचे फोटोसेशन चर्चेचा विषय ठरले होते. या फोटोसेशन दरम्यान आपण 31 डिसेंबर रोजी राजकीय प्रवेशाबाबत निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. 

तमीळ अस्मितेचा अडथळा 
राज्यातील 234 मतदारसंघांमध्ये पक्षबांधणी करताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात तरी रजनीकांत यांचा पक्ष दुसऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याच्या तयारीत नाही. काही दिवसांपूर्वी केवळ पक्षाची बांधणी न झाल्यानेच त्यांनी स्थानिक निवडणुका लढविणे टाळले होते. रजनीकांतना यांना पक्ष उभारला तरीसुद्धा कडवट तमीळ अस्मिता आड येऊ शकते. कारण, येथील बुद्धिवंतांचा एक वर्ग त्यांना तमीळ मानत नाही. 

चाहते मतदार होतील? 
राजकारणात येण्यापूर्वीच विजयकांत यांनी रजनीकांत यांना पक्षबांधणी करणे हे चित्रपट काढण्याएवढे सोपे नसल्याचे म्हटले होते. एक यंत्रणा उभारल्यानंतर त्यांना राज्यभर दौरे करावे लागतील. लोकांना काय सांगायचे आहे, हे आधीच ठरवून तसा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचवावा लागेल. लोकांचा विश्‍वास ही रजनीकांत यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. कारण हा माणूस केवळ पैसा, प्रसिद्धीसाठी राजकारणात आलेला नाही, हे येथील जनता जाणून आहे. चाहत्यांना मतदार बनविण्याचे अवघड काम रजनीकांत यांना करावे लागेल. 

सरत्या 2017 च्या अखेरीस रजनीकांत हे सर्वांत मोठे न्यूज मेकर ठरले असून, सुपरस्टार रजनी राजकारणात येत आहेत. 
अनुपम खेर, अभिनेते 

रजनीकांत यांनी कलेला हृदय आणि आत्मा अर्पण केला असून, लोकांच्या प्रेमानेच त्यांना सुपरस्टार बनविले. राजकारणातही लोक त्यांच्यावर असेच प्रेम करतील. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा. 
रितेश देशमुख, अभिनेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com