भाजप झाला राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष 

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

प. बंगालमध्ये तृणमूलच 
पश्‍चिम बंगालमध्ये पाच जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये तृणमूल कॉंग्रेसने त्यांच्या चारही जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसच्या अभिषेक मनू संघवी यांनीही एका जागेवर विजय मिळविला. 

नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेतही भाजप हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 12 जागा जिंकल्याने आता त्यांचे राज्यसभेतील संख्याबळ 69 झाले आहे.  

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत एकत्र आलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला धक्का देत भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 9 जागा जिंकल्या. क्रॉस व्होटिंगच्या आरोपाने रंगलेल्या या निवडणुकीत समाजवादी पक्षाला आपली जागा राखण्यात यश आले. मात्र, बसपला आपली जागा गमवावी लागली. 

राज्यसभेच्या 58 जागांपैकी 10 राज्यांतील 32 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित 26 जागांसाठी आज 7 राज्यांत निवडणूक झाली. उत्तर प्रदेशशिवाय कर्नाटकमध्येही क्रॉस व्होटिंगचा आरोप झाला. 

उत्तर प्रदेशमधील दहा जागांसाठी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपचे 9 उमेदवार विजयी झाले. समाजवादी पक्षाच्या उमेदवार जया बच्चनही राज्यसभेवर निवडून आल्या. दहाव्या जागेसाठी चुरशीने झालेल्या लढतीत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या अनिल अग्रवाल यांनी बसपच्या बी. आर. आंबेडकर यांचा पराभव केला. उत्तर प्रदेशमध्ये सपने नितीन अग्रवाल आणि बसपने अनिल सिंह यांचे मत अवैध ठरविण्याची मागणी केली होती. या दोन आमदारांनी आपली मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवली नसल्याचा आरोप या पक्षांनी केला होता. त्यामुळे काही काळ मतमोजणी थांबविण्यात आली होती. 

कर्नाटकात कॉंग्रेसला यश 
कर्नाटकात अतिशय अटीतटीने झालेल्या चार जागांपैकी कॉंग्रेसने तीन जागा जिंकल्या, तर भाजपला एका जागेवर विजय मिळाला. कॉंग्रेसचे सैद नासीर हुसैन, एल. हनुमंतैया आणि जी. सी. चंद्रशेखर, तर भाजपचे राजीव चंद्रशेखर विजयी झाले. 

प. बंगालमध्ये तृणमूलच 
पश्‍चिम बंगालमध्ये पाच जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये तृणमूल कॉंग्रेसने त्यांच्या चारही जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसच्या अभिषेक मनू संघवी यांनीही एका जागेवर विजय मिळविला. 

तेलंगणमध्ये टीआरएसचे वर्चस्व 
तेलंगणमध्ये सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) वर्चस्व राखताना सर्व तीनही जागा आपल्या नावावर केल्या. बी. प्रकाश, जे. संतोष कुमार आणि ए. बी. लिंगैया यादव राज्यसभेवर निवडून गेले. कॉंग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री पी. बलराम नाईक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, छत्तीसगडमधील एकमेव जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सरोज पांडे यांनी कॉंग्रेसच्या लेखराम साहू यांचा पराभव केला. केरळमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार वीरेंद्र कुमार विजयी झाले. झारखंडमधून भाजपचे समीर उरांव आणि कॉंग्रेसचे धीरज साहू राज्यसभेवर गेले.

Web Title: National news Rajya Sabha election result BJP 69 seats