'संघ' तीनच दिवसांत लष्कर उभारू शकतो: मोहन भागवत

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

देशासमोर आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यघटनेने परवानगी दिली तर आमचे स्वयंसेवक युद्धाच्या आघाडीवरदेखील जातील. रा. स्व. संघ ही काही लष्करी अथवा निमलष्करी संघटना नसून, ते एक पारिवारिक संघटन आहे. येथे प्रत्येक स्वयंसेवक लष्कराच्या शिस्तीमध्ये वावरत असतो.

मुझफ्फरपूर : देश संकटात सापडला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीनच दिवसांमध्ये लष्कर उभे करू शकतो, असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथील संघाच्या शिबिरामध्ये बोलताना केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. 

देशासमोर आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यानंतर राज्यघटनेने परवानगी दिली तर आमचे स्वयंसेवक युद्धाच्या आघाडीवरदेखील जातील. रा. स्व. संघ ही काही लष्करी अथवा निमलष्करी संघटना नसून, ते एक पारिवारिक संघटन आहे. येथे प्रत्येक स्वयंसेवक लष्कराच्या शिस्तीमध्ये वावरत असतो. आमचे स्वयंसेवक हे नेहमीच देशासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार असतात, असेही त्यांनी नमूद केले.

भागवत यांनी या वेळी स्वयंसेवकांना समाजामध्ये चांगली वर्तणूक ठेवण्याचे आवाहन केले. सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर स्वयंसेवकांनी आपले चारित्र्य जपावे आणि आपल्या वर्तणुकीतूनच समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. 
 

Web Title: National news RSS chief Mohan Bhagwat says can raise force in days Army needs months