पाकिस्तानने सुवासिनींना विधवेसारखं भेटायला लावले: स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

पाकिस्तानने या दोघींना मराठीत बोलण्याची परवानगी दिली नाही. मराठीत बोलल्यानंतर इंटरकॉम बंद करण्यात आला. पाकिस्तानने जाधव यांच्या पत्नीच्या चपला उतरवाव्या लावल्या. चपलेत कॅमेरा, चीप असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दोन विमानांतून प्रवास करताना त्यांना चीप, कॅमेरा आढळून आले नाही का? त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. कुलभूषण तणावात असल्याचे त्यांच्या आई व पत्नीने सांगितले. त्यांची प्रकृती चांगली नसल्याचे दिसत होते.

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांची त्यांची आई व पत्नीशी भेट घडवून पाककडून एका आईच्या भावनेशी खेळ करण्यात आला. दोन सुवासिनींना विधवेसारखे त्यांना भेटायला लावले, असे निवेदन करत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारले.

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची सोमवारी त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट झाली. केवळ 40 मिनिटांच्या या भेटीसाठी पाकिस्तानने कुलभूषण यांची आई आणि पत्नी दोघींचाही मानसिक छळ केल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. यावर सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत निवेदन दिले.

सुषमा स्वराज म्हणाल्या, ''आम्ही सतत पाठपुरावा केल्यानंतर पाकिस्तान अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली. तब्बल 22 महिन्यांनंतर आई आणि बायकोची त्यांच्याशी भेट घडवून आली. पण, प्रत्यक्ष भेटू दिले नाही. माध्यमांना या भेटीपासून दूर ठेवण्याचे ठरल्यानंतरही पाकिस्तानी माध्यमांकडून जाधव यांच्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. त्यांच्या माध्यमांना कुटुंबीयांच्याजवळ जाऊ देण्यात आले. सुरक्षेचे कारण देत कुलभूषण यांच्या आई व पत्नीचे कपडे बदलण्यात आले. कुलभूषण यांच्या आई फक्त साडी घालतात, पण त्यांना सलवार, कुर्ता घालावा लागला. या दोघींना टिकली, मंगळसूत्र उतरविवावे लावले. कपाळावर टिकली आणि मंगळसूत्र नसल्याने कुलभूषणने त्यांच्या आईला विचारले बाबा कसे आहेत. या दोघींना विधवा असल्याच्या रुपात तेथे नेण्यात आले.''

पाकिस्तानने या दोघींना मराठीत बोलण्याची परवानगी दिली नाही. मराठीत बोलल्यानंतर इंटरकॉम बंद करण्यात आला. पाकिस्तानने जाधव यांच्या पत्नीच्या चपला उतरवाव्या लावल्या. चपलेत कॅमेरा, चीप असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दोन विमानांतून प्रवास करताना त्यांना चीप, कॅमेरा आढळून आले नाही का? त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. कुलभूषण तणावात असल्याचे त्यांच्या आई व पत्नीने सांगितले. त्यांची प्रकृती चांगली नसल्याचे दिसत होते. या भेटीत मानवता आणि सद्भावना नव्हतीच. त्यामुळे पाकिस्तानच्या या व्यवहाराची भारतातील सर्व नागरिक निंदा करत आहेत, असे स्वराज यांनी सांगितले.

Web Title: National news Sushma Swaraj statement on Kulbhushan Jadhav Pakistan custody