काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर हल्ला; 2 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सुंजवान येथील लष्कराच्या तळाशेजारी जवानांच्या कुटुंबीयांसाठी वसाहत आहे. या वसाहतीला तीन ते चार दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले असून, अन्य चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

श्रीनगर - जम्मू-पठाणकोट रस्त्यावरील सुंजवान येथील लष्कराच्या तळावर आज (शनिवार) पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लात दोन जवान हुतात्मा झाले असून, अन्य चार जण जखमी झाले आहेत. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर, दोन दहशतवाद्यांना घेरण्यात जवानांना यश आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंजवान येथील लष्कराच्या तळाशेजारी जवानांच्या कुटुंबीयांसाठी वसाहत आहे. या वसाहतीला तीन ते चार दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले. तर, गोळीबाराच एका मुलीसह चार जण जखमी झाले आहेत. जवानांकडून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा दहशतवादी हल्ला केल्याची शक्यता आहे.

या परिसराला लष्करी जवान व पोलिसांनी घेराव घातला असून, दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास हा हल्ला झाला. या तळावर दहा वर्षांपूर्वीही दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये अनेक जवान हुतात्मा झाले होते. जम्मूमध्ये या वर्षात पहिल्यांदाच लष्कराच्या तळावर हल्ला करण्यात आला आहे.

Web Title: National news Terrorists Attack Army Camp In Jammu Soldier Injured