सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला

यूएनआय
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे. 

नवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे. 

हवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या हवाई योद्‌ध्यांनी हवाई दलाचा आणि भारताचा ध्वज उंच शिखरांवर फडकाविल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल,’ असे गौरवोद्गार धनोआ यांनी काढले. अत्यंत प्रगल्भपणे आणि संतुलित पद्धतीने आखलेल्या या व्हिन्सन मोहिमेमुळे नवा इतिहास निर्माण झाल्याचेही धनोआ म्हणाले. व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता. 

माउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.

सात शिखरांच्या या मोहिमेदरम्यान माउंट एव्हरेस्ट चढत असताना २००५ मध्ये स्क्वाड्रन लीडर एस. एस. चैतन्य यांचा मृत्यू झाला होता. त्रिपाठी यांनी सात शिखर सर करण्याचे यश त्यांनाच समर्पित केले. हवाई दलाने एव्हरेस्ट सर केल्यानंतरच इतर खंडांमधील शिखरे सर करण्याच्या मोहिमेची आखणी झाली होती. या सर्वोच्च सात शिखरांवर तिरंगा फडकाविण्याची एकमेवाद्वितीय मोहीमच हवाई दलाने आखली होती.

Web Title: national news tiranga on seven highest peak