भारतात महिन्याभरापासून महिला तुरुंगात; आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुटकेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

जामिनाशिवाय पोलिसांच्या ताब्यात असून तिचं लैगिंक शोषण झाल्याचेही आरोप आहेत.

नवी दिल्ली : पंजाबची ट्रेड युनियन कार्यकर्ता आणि दलित कामगार असलेली नवदीप कौर जवळपास एक महिन्यापासून जेलमध्ये डांबली गेलीय. 23 वर्षांच्या नवदीप कौर हिला 12 जानेवारी रोजी हरियाणामध्ये कामगारांच्या आंदोलनाच्या दरम्यान अटक केली गेली होती. कौर तेंव्हापासूनच जामिनाशिवाय पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच तिचं लैगिंक शोषण झाल्याचेही आरोप आहेत. हे प्रकरण तेंव्हा बातम्यांमध्ये आलं जेंव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी यासंदर्भात ट्विट केलं होतं. वकील आणि लेखिका असलेल्या मीना हॅरिस अलिकडेच शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरुन चर्चेत आहेत. गेल्या शनिवारी मीना हॅरिस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्टर ट्विट केलं होतं ज्यात नवदीप कौर हिच्या सुटकेची मागणी त्यांनी केली आहे. 

त्यांनी नवदीपची बहिण राजवीर कौरच्या ट्विटला रिट्विट केलं होतं. हे ट्विट त्यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटींचं पोस्टर जाळणाऱ्या फोटोंच्या उत्तरादाखल केलं गेलं होतं. नवदीप कौर ही सोनीपतमधील कुंडली इंडस्ट्रीयल एरियामधील एका कंपनीमध्ये काम करत होती. ही कंपनी दिल्ली-हरियाणा बॉर्डरपासून फक्त 3 किमी अंतरावर आहे, जिथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. नवदीपच्या परिवारात अनेक जण ऍक्टीविस्ट राहिलेले आहेत. तिचे वडील पंजाबच्या किसान युनियनचे सदस्य राहिलेले आहेत. तर तिची बहीण दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे.

हेही वाचा - ईडी लागली पत्रकारांच्या मागे; अभिसार शर्मांच्या ऑफिसवर छापा
नवदीप स्वत: कामगार अधिकार संघटनेशी निगडीत आहे. तसेच कामगारांच्या हक्कासाठी ती लढते. मात्र, कंपनीमध्ये काम केल्यानंतर चार महिन्यांनंतर तिला तिथून काढलं गेलं. 12 जानेवारी रोजी जेंव्हा ती इतर 20 कामगारांसोबत योग्य रोजंदारीसाठी आंदोलन करत होती तेंव्हा त्यांचा पोलिसांशी संघर्ष झाला. त्यानंतर नवदीपला अटक करण्यात आली. नवदीपवर हत्या, वसूली, चोरी, दंगा भडकवणे, बेकायदेशीर रित्या जमणे सारखे आरोप लावले गेले आहेत. या सर्व आरोपांना खोटं ठरवत तिची बहिण राजवीर कौर हिने म्हटलंय की, पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिचा छळ केला आहे तसेच लैंगिक शोषण देखील केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naudeep Kaur After Farmers International Attention On Activist In Jail For 20 Days