ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नवीन पटनाईक यांचा पाचव्यांदा शपथविधी

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

ओडिशाला लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच फणी चक्रीवादळाच्या झंझावाताला सामोरे जावे लागले होते. यातून आता राज्य सावरले असून, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलाने (बीजेडी) विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश  मिळविले आहे.

भुवनेश्‍वर : विधानसभा निवडणुकीत एकूण 146 पैकी 112 जागांवर 'बीजेडी'ने विजय मिळविल्यानंतर नवीन पटनाईक यांनी आज (बुधवार) पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ओडिशाला लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच फणी चक्रीवादळाच्या झंझावाताला सामोरे जावे लागले होते. यातून आता राज्य सावरले असून, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलाने (बीजेडी) विधानसभा निवडणुकीत निर्भेळ यश  मिळविले आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीनंतर या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लाट असल्याचे सिद्ध झाले असले, तरी ओडिशा विधानसभेवर मात्र पुन्हा एकदा नवीन पटनाईक यांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. सत्ताधारी "बीजेडी'ने त्यांचे विरोधक भाजप व काँग्रेसवर स्पष्ट मात केली. 'बीजेडी'ला बळकट करण्यात आणि यशाच्या शिखरावर पोचविणारे पक्षाचे अध्यक्ष पटनाईक यांनी आज पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

देशातील बहुतेक राज्यांत भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी मोठे यश मिळविलेले असले तरी ओडिशात मात्र भाजपला मुख्य विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार आहे. मावळत्या विधानसभेत भाजपचे 10 सदस्य होते. राज्यात 2000पासून कायम मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या कॉंग्रेसला या वेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागत आहे. मावळत्या विधानसभेत पक्षाचे 16 आमदार होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naveen Patnaik sworn-in as Odisha Chief Minister for fifth consecutive term