सिद्धू यांनी घेतली राहुल गांधींची भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी काही कारणांवरून वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी काही कारणांवरून वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी सिद्धू यांनी राहुल गांधींना एक पत्र दिले. सिद्धू यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबतच्या भेटीचा एक फोटो ट्विटरवरून पोस्ट केला आहे.

राहुल गांधी यांना दिलेल्या पत्राबाबत सिद्धू यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यामध्ये वाद निर्माण झाले होते. अमरिंदर यांनी 6 जूनला आयोजित केलेल्या कॅबिनेट बैठकीला देखील सिद्धू उपस्थित राहिले नव्हते.

अमरिंदर आणि सिद्धू यांच्यामधील वाद टोकाला गेल्यानंतर सिद्धू यांच्याकडील शहर विकास विभाग काढून त्यांना ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. नवीन पदावर रुजू होण्याऐवजी सिद्धू गेल्या आठवड्यात राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र, दोन दिवस वाट पाहिल्यानंतरही सिद्धू यांची राहुल यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती. 

पराभव ही सामूहिक जबाबदारी : सिद्धू
काही दिवसांपूर्वी सिद्धू यांनी म्हटले होते की, पक्षाच्या कामगिरीबद्दल मला लक्ष्य करणं हे चुकीचे असून फक्त माझ्या विरुद्धच कारवाई कशी होऊ शकते? पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. मी कायम चांगला नेता राहिलो आहे. काही लोक मला पक्षातून काढून टाकण्याचा विचार करत आहेत. 

नवज्योत कौर यांना तिकीट न मिळाल्याने सिद्धू नाराज
लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर-सिद्धू यांनी अमरिंदर यांच्याविषयी नाराजी दाखविली होती. मात्र, अमरिंदर यांनी हा आरोप फेटाळला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navjot Singh Sidhu Meets Rahul Gandhi