
अनंत पटेल आणि इतरांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन आणि कुलगुरूंच्या टेबलावर ठेवलेला पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याचा आरोप आहे.
PM Modi News: PM मोदींचा फोटो फाडला म्हणून काँग्रेस आमदाराला ठोठावला 99 रुपयांचा दंड
गुजरातमधील नवसारी येथील न्यायालयानं (Navsari Court) काँग्रेस आमदार अनंत पटेल (Congress MLA Anant Patel) यांना शिक्षा सुनावलीये. अनंत पटेल यांच्यावरील हे प्रकरण 2017 मध्ये झालेल्या एका निदर्शनाशी संबंधित आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कृषी विद्यापीठाच्या (Agricultural University) कुलगुरूंच्या दालनात घुसून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो फाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालयानं काँग्रेस आमदाराला दोषी ठरवलं आणि त्यांना 99 रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. ए. धदल यांच्या न्यायालयानं वंसदा (अनुसूचित जाती) मतदारसंघाचे आमदार अनंत पटेल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 447 अंतर्गत दोषी ठरवलंय.
पटेल आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांसह इतर सहा जणांवर आयपीसी कलम 143 (बेकायदेशीर सभा), 353 (हल्ला), 427 (नुकसान करणं), 447 (गुन्हेगारी घुसखोरी) आणि 504 (हेतूपूर्वक अपमान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अहवाल मे 2017 मध्ये जलालपूर पोलीस ठाण्यात नोंद होता.
अनंत पटेल आणि इतरांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवसारी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन आणि कुलगुरूंच्या टेबलावर ठेवलेला पंतप्रधान मोदींचा फोटो फाडल्याचा आरोप आहे.
न्यायालयानं या प्रकरणातील पटेल यांच्यासह तीन आरोपींना गुन्हेगारी स्वरुपात दोषी ठरवलं आणि त्यांना 99 रुपये दंड जमा करण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास सात दिवस कारावास भोगावा लागणार आहे.
फिर्यादी पक्षानं अनंत पटेल यांना आयपीसी कलम 447 अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केलीये. यामध्ये तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची तरतूद आहे.