नवाझ शरीफ यांना मूत्रपिंडाचा विकार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्‍यकता असल्याची शिफारस तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाने केली असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

इस्लामाबाद - भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून, त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्‍यकता असल्याची शिफारस तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाने केली असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. 

"पनामा पेपर्स'प्रकरणी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शरीफ यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. 13 जुलैपासून शरीफ यांना रावळपिंडीतील आदिआला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 

तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाने शरीफ यांच्या प्रकृतीची तपासणी केली असून, त्यांचे मूत्रपिंड निकामी होण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे शरीफ यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करावे, अशी शिफारस या पथकाने केली आहे. शरीफ यांच्या प्रकृतीसंदर्भातील वैद्यकीय माहितीचा अहवाल पंजाबच्या आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. 

शरीफ यांनी शनिवारी आपली प्रकृती बिघडली असल्याची तक्रार केली होती. शरीफ यांना रुग्णालयात हलविण्याबाबतच्या पंजाबच्या गृह विभागाच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत, अशी माहिती तुरुंगाच्या प्रशासनाकडून देण्यात आली. 

निवासस्थानाला उपकारागृहाचा दर्जा द्या! 
नवाज शरीफ, त्यांची कन्या आणि जावयाचे निवासस्थान उप-कारागृह म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शरीफ यांच्या विरोधातील प्रकरणांची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाला उप-कारागृहाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी करणारी याचिका वतन पार्टीचे प्रमुख बॅरिस्टर झफरुल्ला खान यांनी केली आहे. शरीफ यांनी तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधानपद सांभाळले आहे, त्यामुळे तुरुंगवासाच्या काळात त्यांना आवश्‍यक त्या सोई-सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, शरीफ यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची जबाबदारी पंजाब सरकारची असून, त्यात हालगर्जीपणा केला जाणार नाही, असे एका मंत्र्याने स्पष्ट केले. 
 

Web Title: Nawaz Sharif on verge of kidney failure