नक्षलवाद्यांनी दिल्या पुतळ्यांच्या हाती बंदुका

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

जवानांची दिशाभूल करण्यासाठी नव्या तंत्राचा वापर; 13 पुतळे जप्त 

रायपूर : इतर अनेक राज्यांबरोबरच छत्तीसगडमधील बस्तर या आपल्या बालेकिल्ल्यातच नक्षलवाद्यांची कोंडी होत असल्याने ते सुरक्षा जवानांशी लढताना नवे तंत्र वापरत आहेत. गनिमी काव्याचे तंत्र वापरून नक्षलवादी मानवी पुतळ्यांच्या हाती बनावट बंदुका ठेवून हे पुतळे मोक्‍याच्या ठिकाणी उभे करत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक चकमकी अणि मोहिमांमध्ये सुरक्षा जवानांनी अनेक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. जवानांच्या या आक्रमकपणापुढे अनेक भागांत नक्षलवाद्यांनी हाय खाल्ली आहे. नक्षलविरोधी पथके दाट जंगलांमध्ये खोलवरही कारवाया करत असल्याने त्यांची अनेक लपण्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. छत्तीसगडमधील बस्तर भागातील सुकमा जिल्हा हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथेही जवानांनी आणि पोलिसांनी धडाडीने मोहिमा राबविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या पथकांची दिशाभूल करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पुतळ्यांचा आधार घेतला आहे. गवताने भरलेल्या या मानवी पुतळ्यांच्या हाती खोटी बंदूक देऊन त्यांना मोक्‍याच्या ठिकाणी उभे केले जात आहे. लांबून हे पुतळे म्हणजे लपून बसलेले नक्षलवादीच असल्याचा भास होत असल्याने पथकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असतो. त्यांनी प्रथमच अशा तंत्राचा वापर केला आहे. गेल्या आठ दिवसांत जवानांनी असे 13 पुतळे जप्त केले आहेत. काही पुतळ्यांच्या जवळ अत्याधुनिक स्फोटके पेरुन ठेवलेलेही आढळून आले आहेत. व्हिएतनाम युद्धावेळी येथील नागरिकांनी अमेरिकी सैन्याविरोधात असेच गनिमी काव्याचे तंत्र वापरले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

पुतळे ठेवण्यामागील कट 
- जवानांची दिशाभूल करणे 
- मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचे भासवून मानसिक दबाव निर्माण करणे 
- पुतळ्यांजवळ स्फोटके पेरुन जवानांवर हल्ले करणे 

नक्षलवाद्यांचे प्रयोग 
सुरक्षा जवानांवर हल्ले करण्यासाठी, त्यांना चकविण्यासाठी नक्षलवादी कायम निरनिराळे प्रयोग करत असतात. जगभरात विविध ठिकाणी झालेल्या युद्धांमध्ये वापरलेली तंत्रे, हॉलिवूडच्या ऍक्‍शनपटांमध्ये दाखविलेली कृत्ये यांचा अभ्यास नक्षलवादी करतात आणि त्याची नोंद करून ठेवतात, असे छाप्यांमध्ये आढळून आलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या विविध तंत्रांचे प्रयोग करून ते जवानांची प्रतिक्रिया आजमावतात आणि त्यानुसार कारवाया करतात, असेही आढळून आले आहे. 
 

Web Title: Naxals give gunas in the hands of statues