
Sharad Pawar : नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार? शरद पवारांसमोर मोठा पेच
मुंबईः नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. परंतु शरद पवार यांच्यासमोर एक वेगळाच पेच निर्माण झालेला असून उद्या त्याबाबत निर्णय होणार आहे.
नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागालँडचे राज्यपाल ला गणेशन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.
हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत NDPP-भाजप युतीने ३७ जागा जिंकल्या आहेत. भाजपची एनडीपीपीसोबत युती आहे. २०१८ च्या निवडणुकीत रिओ यांनी भाजपसोबत युती केली होती. गेल्या निवडणुकीत युतीला ३० जागा मिळाल्या होत्या. यावेळी युतीने ३७ जागा जिंकल्या.

नागालँडमध्ये गतवेळीही विरोधी पक्ष नव्हता, सर्वपक्षीय सरकार होतं. यावेळीह तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा विचार आहे. तेथील स्थानिक नेते सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही आहेत. तसं झालं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपसोबत गेल्याचा शिक्का पडू शकतो.
उद्या सकाळी शरद पवार यांच्या भेटीनंतर निर्णय होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँड प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितलं. भाजपसोबत जाण्यावरुन तेथील स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. 'एबीपी माझा'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप आघाडीला पूर्ण बहुमत आहे. तरीही सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादीच्या सात आमदारांचा आग्रह असल्याचं समोर येत आहे.