भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंना उमेदवारी

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक आता येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 जुलै आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून याआधीच उपराष्ट्रपतीपदासाठी ज्येष्ठ विचारवंत गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचे सूप वाजत असतानाच भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) आज (सोमवार) उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ पक्षनेते व्यंकय्या नायडू यांचे नाव घोषित करण्यात आले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सर्व पक्षांचा नायडू यांच्या उमेदवारीस पाठिंबा असल्याचे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नायडूंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

नायडू हे सध्याच्या केंद्र सरकारमध्ये नगरविकास व माहिती प्रसारण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळत आहेत. एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विविध राज्यांमधील दौऱ्यांवेळी नायडू यांनी त्यांना सहाय्य केले होते.

दाक्षिणात्य राज्यांमध्ये आपला प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिण भारतामधील उमेदवार निवडण्यात येईल, अशी अटकळ याआधी बांधण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर, नायडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक आता येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 18 जुलै आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून याआधीच उपराष्ट्रपतीपदासाठी ज्येष्ठ विचारवंत गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे.

Web Title: NDA nominates Venkaiah Naidu as vice-presidential candidate