शिक्षणाला रंगभूमीशी जोडण्याची गरज : सुरेश शर्मा

मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : शाळांमध्ये संगीत शिकविले जाते, मग शास्त्रशुद्ध पद्धतीने नाटक का शिकविले जात नाही. नाट्यकला ही तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविण्याचा उत्तम मार्ग आहे. म्हणूनच शिक्षणाला रंगभूमी जोडण्याची गरज आहे. दिल्ली सरकारने हा प्रयोग सुरू केला आहे. अन्य राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) प्रभारी संचालक सुरेश शर्मा यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली : शाळांमध्ये संगीत शिकविले जाते, मग शास्त्रशुद्ध पद्धतीने नाटक का शिकविले जात नाही. नाट्यकला ही तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविण्याचा उत्तम मार्ग आहे. म्हणूनच शिक्षणाला रंगभूमी जोडण्याची गरज आहे. दिल्ली सरकारने हा प्रयोग सुरू केला आहे. अन्य राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) प्रभारी संचालक सुरेश शर्मा यांनी व्यक्त केले. 
विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा कार्यभार शर्मा यांच्याकडे देण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रात एनएसडीचे केंद्र नाही, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "नाट्य विद्यालयाची प्रादेशिक केंद्रे असली पाहिजेत. असे केंद्र मुंबईत सुरू करण्यासाठी वामन केंद्रे हे प्रयत्नशील होते. या विद्यालयाचे आगरतळा, बंगळूर, वाराणसी येथे केंद्रे आहेत, त्याच धर्तीवर मुंबईतही उपकेंद्र सुरू करण्यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.'' 

"नाट्यकला शाळांमधूही शिकविली गेली पाहिजे, असे सांगत ते म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) त्यावर काम करीत आहे. त्यांचे एक प्रारूप तयार आहे. त्यानुसार दिल्ली सरकारने शाळांमध्ये प्रयोग सुरू केला आहे. अन्य राज्यांनी पुढाकार घेतला, तर नाट्यकलेचे गुण अंगी असणाऱ्या विद्यार्थ्यांना लहान वयातच भविष्य घडविण्यासाठी याचा उपयोग होईल.'' 

दिल्लीतील नाट्य विद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणारे अनेक कलाकार रंगभूमीकडे पाठ करून चित्रपटांकडे वळतात, या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट भाष्य केले. ते म्हणाले, "भारतात आयआयटी, आयआयएममध्ये शिकून विद्यार्थी देशात राहण्यापेक्षा परेदशात काम शोधतो. मग कलाकार सिनेमाकडे वळला, तर बिघडले कुठे? त्यालाही प्रगती करण्याचा, पैसे कमावण्याचा अधिकार आहे. हे लोकही रंगभूमीवरच थांबतील. त्यासाठी त्यांना काम मिळायला हवे. शाळांमध्ये नाटक आले, तर नाट्यकलेसाठी झटणाऱ्या लोकांनाही काम मिळेल.'' 

असंख्य तरुण कलाकार त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये नाटक करीत असतात. त्यांनाही दिल्लीत "एनएसडी'मध्ये यायचे असते. परंतु, याच तरुणांना स्थानिक स्तरावर नाट्य प्रशिक्षण किंवा पदविका देणारी संस्था असेल, तर प्रत्येक राज्यांत स्थानिक भाषेतील नाटकांना आणखी झळाळी मिळेल. त्यासाठी राज्य सरकारांनी अशा संस्था उभ्या कराव्यात. 
- सुरेश शर्मा, प्रभारी संचालक, एनएसडी 

Web Title: Need to connect education with theater Suresh Sharma