Rahul Gandhi : ‘डेटा’ सुरक्षेसाठी योग्य नियम हवेत - राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

need rules for data security Rahul Gandhi Silicon Valley startup entrepreneurs and technologists

Rahul Gandhi : ‘डेटा’ सुरक्षेसाठी योग्य नियम हवेत - राहुल गांधी

सनिव्हेल : आजच्या युगामध्ये डेटा हे नवे सोने असून त्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य नियम असणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मांडले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचे माहेरघर असलेल्या सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप नवउद्यमींशी राहुल यांनी आज संवाद साधला.

‘प्लग आणि प्ले टेक सेंटर’चे सीईओ सईद अमिदी आणि ‘फिक्सनिक्स’ स्टार्टअपचे संस्थापक शाऊन शंकरन राहुल यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. या सगळ्या नव्या तंत्रज्ञानाचा देशातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसावर परिणाम होणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.

राहुल म्हणाले की, ‘‘ भारतासारख्या देशामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तुमच्याकडे अशी प्रणाली हवी जिथे मोठ्या प्रमाणावर सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले असेल.’’ यावेळी राहुल यांनी ड्रोन तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित नियमांबाबत त्यांना स्वतःला आलेल्या अनुभवाबाबत माहिती दिली.

नोकरशहांकडून आपल्यासमोर अनेक अडथळे आणण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राहुल यांनी यावेळी एआय, बिग डेटा, मशिन लर्निंग आदी विषयांवर देखील मते मांडली.

राहुल म्हणाले, ‘हॅलो मि. मोदी’

राहुल यांनी पेगॅसस स्पायवेअर आणि त्याच्यासारख्या अन्य तंत्रज्ञानाचा मुद्दा देखील उपस्थित केला. प्रेक्षकांना त्यांनी टॅपिंगबाबत आपल्याला कसलीही चिंता नसल्याचे नमूद केले. माझा फोन टॅप केला जातोय हे मला माहिती असल्याचे सांगतानाच त्यांनी संवादादरम्यानच विनोदाने आपल्या आयफोनवरून ‘हॅलो मोदी’ असे उद्‍गार काढले. मला वाटले की, माझा फोन हा टॅप झाला आहे असे त्यांनी सांगताच सभागृहामध्ये हशा पिकला.

तर सरकारला कोणी रोखू शकत नाही?

सरकारनेच जर तुमचा फोन टॅप करायचे ठरविले असेल तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही, असे माझे मत आहे. सरकारला जर तुमचा फोन टॅप करण्यात रस असेल तर हा काही योग्य पातळीवरील संघर्ष आहे असे म्हणता येणार नाही.

माझ्या मते, मी जे काही काम करतो त्याची नोंद ही सरकारकडे असते. मध्यंतरी अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांवर नजर ठेवली जात होती, ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती, असे राहुल यांनी सांगितले.

अपात्र ठरल्याने कामाची संधी

राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हा मी कधीही अशी कल्पना केली नव्हती की आपल्याला लोकसभेतून अपात्र ठरविण्यात येईल. पण सरकारने मला अपात्र घोषित केल्याने लोकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे राहुल यांनी नमूद केले.

हे सगळे नाट्य सहा महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. आम्ही आणि अवघा विरोधी पक्ष संघर्ष करत होतो. देशामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत होतो त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.

चीन सोबतच्या संबंधांमध्ये तणाव

कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांशी राहुल यांनी संवाद साधला. भारत- चीन संबंधांवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘‘ दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून ही तितकीशी सोपी गोष्ट राहिलेली नाही.’’

चीनसोबतच्या पुढील पाच ते दहा वर्षांतील संबंधांकडे तुम्ही कसे पाहता? अशी विचारणा केली असता राहुल यांनी ही परिस्थिती आता कठीण झाली असल्याचे सांगितले. त्यांनी आपला बराचसा भूभाग ताब्यात घेतला असल्याने हे संबंध आणखी तणावपूर्ण बनले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhi