लेफ्टनंट जनरल रावत नवे लष्करप्रमुख

पीटीआय
रविवार, 18 डिसेंबर 2016

एअर मार्शल धनोआ हवाई दलाचे प्रमुख

नवी दिल्ली - भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने आज लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली; तसेच नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचेही नाव सरकारने जाहीर केले आहे. 

एअर मार्शल धनोआ हवाई दलाचे प्रमुख

नवी दिल्ली - भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने आज लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली; तसेच नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचेही नाव सरकारने जाहीर केले आहे. 

सध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेतील. दोन महिन्यांपूर्वीच रावत यांच्याकडे लष्कराचे उपप्रमुखपद सोपविण्यात आले होते. १९७८ मध्ये गोरखा रायफल्समधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती. रावत यांना उंचावरील लढायांचा आणि घुसखोरीविरोधी मोहिमांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तान सीमेवरील भारतीय तुकड्यांचे नेतृत्व केले आहे. लष्करप्रमुख कोण असेल, हे ठरविण्याचा केंद्र सरकारचा अधिकार असला तरी रावत यांच्याहून वरिष्ठ असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्करप्रमुखपद दिल्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धानोआ सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या लढाऊ विमानांमधून उड्डाण केले असून, कारगिल युद्धावेळी रात्रीच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांनी थेट सहभाग घेतला आहे.

राजीव जैन ‘आयबी’चे प्रमुख
इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) आणि रिसर्च अॅण्ड ॲनालिसिस विंग (रॉ) या गुप्तचर संस्थांच्या नव्या प्रमुखांची केंद्र सरकारने आज निवड केली आहे. राजीव जैन हे ‘आयबी’चे; तर अनिलकुमार धस्माना हे ‘रॉ’चे प्रमुख असतील. हे दोन्ही अधिकारी एक जानेवारी २०१७ ला नवी जबाबदारी स्वीकारणार असून, त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे. 

राजीव जैन हे १९८० च्या बॅचचे झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या ‘आयबी’मध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत असून त्यांनी अतिशय संवेदनशील असलेल्या जम्मू आणि काश्‍मीरसंबंधात काम पाहिले आहे. ‘आयबी’चे प्रमुख दिनेश्‍वर शर्मा हे महिनाअखेरीस निवृत्त होत असून, त्यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली मुदतवाढ नाकारली आहे. आयबीच्या प्रमुखपदासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्तात्रय पडसळगीकर यांचेही नाव चर्चेत होते, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, जैन हे आयबीमधील सध्याचे सर्वांत ज्येष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्याच नावाला पसंती दिली गेल्याची शक्‍यता आहे. धस्माना हे १९८१ च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्याचे ‘रॉ’ प्रमुख राजेंद्र खन्ना यांची जागा घेतील. धस्माना हे मागील २३ वर्षांपासून ‘रॉ’मध्ये आहेत. 

Web Title: The new Army chief Lieutenant General Rawat