भाजपचे 'आप'वरही जाळे; एक आमदार फुटला 

bjp
bjp

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप खुद्द पंतप्रधानांनी केल्यावर विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतील भाजप नेत्यांनाही स्फुरण चढल्याचे दिसत आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी आज केला. "आप'चे पूर्व दिल्लीतील गांधीनगरचे आमदार अनिल वाजपेयी यांनी आज दुपारी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला व "आप'ला नजीकच्या काळात आणखी गळती लागण्याचे साफ संकेत दिले. 

कपिल मिश्रा, अलका लांबा आदींच्या पाठोपाठ अनिल वाजपेयी यांनी "आप'च्या नेतृत्वाला कंटाळून पक्षाला रामराम केला आहे. वाजपेयी यांनी दिल्लीचे प्रभारी श्‍याम जाजू व मंत्री गोयल यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारून केंद्रातील सत्तारूढ पक्षात रीतसर प्रवेश केला. त्यानंतर गोयल यांनी 14 नाराज आमदारांबद्दलचे जाहीर वक्तव्य केले हे लक्षणीय मानले जाते. 

भाजप "आप'च्या आमदारांना प्रत्येकी दहा कोटींची लालूच दाखवून फोडण्याच्या प्रयत्नांत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नुकताच केला होता. दिल्लीत भाजपचे केवळ तीन आमदार असून, "आप'चे 14 आमदार फोडले, तरी दिल्लीतील सरकारला काहीही धक्का लागणार नाही. मात्र "आप'मध्ये फूट पाडणे शक्‍य असल्याचा संदेश दिल्लीकरांत जाईल अशी भाजपची अटकळ आहे. गोयल म्हणाले, की भाजपच्या संपर्कात असलेले 14 आमदार पक्ष सोडू इच्छितात. निराशा व अपमानास्पद वागणुकीमुळे ते फारच दुःखी आहेत. गोयल यांच्या वक्तव्याने दिल्लीत खळबळ उडाली असतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, विरोधकांचे आमदार फोडणे हीच मोदींच्या मते लोकशाही आहे काय, असा प्रश्‍न केला आहे. "आप'च्या आमदारांना खरेदी करणे मोदींसाठी सोपे मुळीच नाही, मात्र अशा खरेदीसाठी भाजप पैसा कोठून आणतो, अशी विचारणा त्यांनी केली. 

भाजपने फोडलेले नाही : जाजू 
"आप'चे अनेक आमदार केजरीवाल यांच्या व्यवहाराबद्दल प्रचंड नाराज व संतप्तही आहेत. वाजपेयी यांना भाजपने फोडले नसून केजरीवाल यांच्याकडून वारंवार झालेल्या अपमानानंतर त्यांनी भाजपचा पर्याय निवडला आहे असा दावा भाजपचे दिल्ली प्रभारी श्‍याम जाजू यानी केला. त्यांनी "सकाळ'ला सांगितले, की अनिल वाजपेयी हे स्वच्छ चारित्र्याचे आमदार आहेत. ते आजही गांधीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. "आप'मध्ये येऊन त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या दूरान्वयेही पूर्ण होत नसल्याचे पाहून त्यांनी भाजपचा पर्याय निवडला आहे. या घडामोडींतून "आप' नेतृत्वाने "हुकूमशाही जास्त काळ टिकत नाही,' हा धडा घेतला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com