राजधानीचा श्‍वास पुन्हा गुदमरला... 

new delhi air pollution
new delhi air pollution

नवी दिल्ली - प्रदूषण नियंत्रण समितीने शुक्रवारी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) परिसरात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. राजधानीतील बांधकामे थांबविण्यात आली आहेत. शाळांनाही सुटी देण्यात आली आहे.

दिल्ली व परिसरातील वायू प्रदूषण दिवाळीपासून धोक्‍याच्या पातळीवर पोचलेले आहे. प्रदूषणाची पातळी गुरुवारी (ता. ३१) रात्री उशिरा ‘सर्वांत घातक’ किंवा ‘आणीबाणी’च्या श्रेणीत पोचल्याने पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने (ईपीसीए) बांधकामांवरही मंगळवारपर्यंत (ता. ५) बंदी घातली आहे. जानेवारीपासून काल प्रथमच प्रदूषणाने ही पातळी गाठली. हिवाळ्यात फटाके फोडण्यासही प्रदूषण समितीने निर्बंध घातले आहेत. ‘ईपीसीए’चे अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, हरियाना, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की दिल्ली आणि ‘एनसीआर’मधील हवेची गुणवत्ता काल रात्री खालावली असून, ती ‘सर्वांत घातक’ या श्रेणीत पोचली आहे. याचा सर्वांवर विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा निर्णय आपल्याला जाहीर करावा लागत आहे.

दिल्लीतील प्रदूषित हवेची तुलना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘गॅस चेंबर’शी केली. शालेय विद्यार्थ्यांना श्‍वासोच्छ्वासासाठी मास्कचे वाटप केजरीवाल यांनी आज केले. पंजाब व हरियाना या शेजारील राज्यांमध्ये या काळात शेतकरी शेतातील कचरा जाळत असल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात धुराचे ढग पसरत असल्याने केजरीवाल यांनी या दोन राज्यांवर टीका केली. जर हवेची गुणवत्ता ‘सर्वांत घातक’ या पातळीवर ४८ तासांपेक्षा जास्त राहिली तर शीघ्रकृती आराखड्यांतर्गत आपत्कालीन उपाययोजना केल्या जातात. यात रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘सम-विषम’ योजना, बांधकामांवर बंदी, शाळांना सुटी जाहीर केली जाते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

प्रदूषित हवेवरील उपाय
- दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील बांधकाम, हॉट मिक्‍स प्लॅंट व खडी मशीन ५ नोव्हेंबरपर्यंत बंद
- कोळसा व इंधनावर आधारित कंपन्यांवरही निर्बंध
- शाळांनाही सुटी जाहीर
- संपूर्ण हिवाळ्यात फटाके फोडण्यास बंदी
- घराबाहेर व्यायाम करू नये
- प्रदूषित वातावरणाचा संपर्क टाळण्याची सूचना

स्थानिक पातळीवरील प्लॅस्टिक आणि कचरा जाळण्यापासून ते धुळीच्या प्रदूषणावर जागरूकपणे लक्ष ठेवणे आणि प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करणे आवश्‍यक आहे. सर्व प्रयत्नांनंतरही स्थानिक पातळीवर प्रदूषणाच्या घटना घडत असल्याचे मला खेदाने सांगावे लागत आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
- भुरेलाल, ‘ईपीसीए’चे अध्यक्ष 

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून केजरीवाल दोषारोपाचा खेळ खेळत आहेत. पंजाब आणि हरियानाला दोष देण्याने ही समस्या सुटणार नाही. या राज्यांवर आरोप करण्यापेक्षा दिल्लीजवळील पाच राज्यांतील कारखान्यांमधून निर्माण प्रदूषित कचरा कमी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुचविलेल्या प्रस्तावाचा केजरीवाल यांनी विचार करावा.
- प्रकाश जावडेकर,  केंद्रीय पर्यावरणमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com