स्वत:च्या अहंकारामुळे राहुल ठरले अपात्र; उद्धव ठाकरेंवरही निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Thakur

राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरविण्याच्या निर्णयात घाई झाल्याचा आरोप विरोधकांकडून होतो आहे. यावर मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली.

Anurag Thakur : स्वत:च्या अहंकारामुळे राहुल ठरले अपात्र; उद्धव ठाकरेंवरही निशाणा

नवी दिल्ली - ओबीसींचा अपमान तसेच वीर सावरकरांचा अपमान या मुद्द्यांवरून केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. अहंकारामुळे राहुल गांधी अपात्र ठरले असून यासाठी काँग्रेसमधूनच षड्‌यंत्र झाले काय?, असा उपरोधिक सवाल अनुराग ठाकूर यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना केला. ‘सत्तेसाठी विचारसरणीशी तडजोड करणारे उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र राहुल गांधींसोबत दिसते तेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंच्याच विचारसरणीची प्रतिनिधित्व करतात काय हा प्रश्न उपस्थित होतो?,’ अशी कोपरखळीही अनुराग ठाकूर यांनी मारली आहे.

राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरविण्याच्या निर्णयात घाई झाल्याचा आरोप विरोधकांकडून होतो आहे. यावर मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली. ‘अदानी प्रकरण आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. ओबीसी समुदायाच्या अपमानामुळे राहुल गांधी अपात्र ठरले आहेत. एका व्यक्तीला लक्ष्य करण्याच्या नादात लक्ष्मणरेषा ओलांडली. त्यांना ओबीसींबद्दल काही वाटत असेल तर ते माफी मागू शकले असते. पण अहंकार आडवा आला,’ असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘राहुल गांधींना अपात्र ठरविण्यात घाई झालेली नाही. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा झाल्याने ते अपात्र ठरले. या शिक्षेच्या स्थगितीसाठी न्यायालयात आव्हान देण्याची गरज होती. राज्यसभेत काँग्रेसचे दिग्गज वकील असताना राहुल गांधींसाठी याचिका दाखल करायला कोणीही का पुढे आले नाही? वकिलांना राहुल गांधींच्या अहंकाराने थांबविले की काही लोकांनी राहुल गांधींपासून मुक्ती हवी म्हणून षड्‌यंत्र केले आहे?’

‘जेपीसी’चा मुद्दा गौण

अदानी प्रकरणात सरकारकडे लपविण्यासाठी काहीही नाही असे स्पष्ट करताना जेपीसीचा मुद्दा गौण असल्याचेही प्रतिपादन मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. ते म्हणाले, की या प्रकरणात सरकारने सर्वोच्च न्यायालयात, संसदेत भूमिका मांडली आहे. राहुल गांधींनी आरोप केले, पण ते पुरावे देऊ शकलेले नाहीत. अदानी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली असल्यामुळे जेपीसीच्या मागणीला अर्थ उरलेला नाही.

त्या सर्वांपेक्षा राहुल मोठे कसे?

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानावरून अनुराग ठाकूर म्हणाले की,‘‘इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ मध्ये सावरकरांवर फिल्म्स डिव्हिजनने माहितीपट बनविला होता. त्यांच्यावर टपाल तिकीट काढले होते. नेहरूंनी सावरकरांची प्रशंसा केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. भगतसिंग त्यांना भेटण्यासाठी गेले होते. या सर्वांपेक्षा राहुल गांधी मोठे आहेत काय?’’ असा सवाल करताना अनुराग ठाकूर यांनी प्रियांका गांधींवरही टीका केली.

ज्या सावरकरांचा नेहरू, इंदिरा गांधींनी सन्मान केला त्यांच्याशी प्रियांका गांधी सहमत आहे की राहुल गांधींशी सहमत आहे, असे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही ठाकूर यांनी दिले. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत उद्धव ठाकर उभे राहतात तेव्हा त्यांची विचारसरणी ही बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी आहे काय हा प्रश्नही उपस्थित होतो, असे अनुराग ठाकूर म्हणाले.