आंध्रला एनडीएच्या काळात दुप्पट मदत

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

अमित शहांचे चंद्राबाबूंना खुले पत्र; सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दुर्दैवी

अमित शहांचे चंद्राबाबूंना खुले पत्र; सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दुर्दैवी

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेले तेलुगू देसमचे सर्वेसर्वा आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नऊ पानी पत्र लिहिले असून, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे नमूद केले आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत एनडीए सरकारने आंध्र प्रदेशला दुप्पट मदत केल्याचा दावा अमित शहा यांनी पत्रात केला आहे. या पत्राच्या माध्यमातून शहा यांनी चंद्राबाबू यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले असून, आंध्र प्रदेशसाठी मोदी सरकारने केलेल्या कामाची यादीच सादर केली आहे.

अमित शहा यांनी खुल्या पत्रात म्हटले, की आपला पक्ष पॉलिटिक्‍स ऑफ परफॉर्मन्स आणि डेव्हलपमेंटवर विश्‍वास ठेवतो. नरेंद्र मोदी सरकारने आंध्र प्रदेशच्या विकास आणि समृद्धीसाठी सर्वतोपतरी प्रयत्न केले आहेत. गेली लोकसभा आणि राज्यसभा (यूपीए सरकारचा कार्यकाळ) आठवा, जेव्हा आपल्याकडे खासदारांचे बळ नव्हते, तेव्हा भाजपने दोन्ही राज्यांतील तेलगू भाषक नागरिकांच्या न्यायासाठी आवाज बुलंद केला होता. चंद्राबाबू नायडू ज्या अन्यायाची गोष्ट करत आहेत, ते कॉंग्रेसचे पाप आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करताना कॉंग्रेसने योग्य व्यवस्थापन राखले नाही आणि राज्याच्या भावनेचा आदर केला नाही. 2014 मध्ये एनडीए सरकार स्थापन होण्यात तेलुगू देसम महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. या माध्यमातून आंध्रच्या भावना जपण्याचा प्रयत्न केल्याचे शहा यांनी नमूद केले आहे. विभाजनाचे सर्वाधिक नुकसान याच राज्याला सोसावे लागले आहे. केंद्राने आंध्रच्या विकासासाठी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्यात भावनेचा आदर केला गेला आहे. गेल्या चार वर्षांत केंद्राकडून झालेल्या मदतीतून ही बाब दिसून येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. एवढेच नाही, तर आंध्र प्रदेश पुनर्संघटन कायदा 2014 नुसार राज्याला दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.

आंध्रसाठी पायाभूत सुविधांसाठीचे केलेले काम
काकीनाडात एचपीसीएल ग्रीन फिल्ड क्रुड ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्‍स
800 किलोमीटरचा वायझॅक-चेन्नई कॉरिडॉर
विशाखापट्टण, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा
राजधानी अमरावतीहून रॅपिड रेल्वे आणि रोड कनेक्‍टिव्हिटीचे अनेक प्रकल्प
विजयवाडाला मेट्रो प्रकल्पाला मान्यता

आंध्रला मदत
यूपीए सरकारच्या काळात ः 1,17,967 कोटी रुपये
एनडीए सरकारच्या काळात ः 2,44,271 कोटी रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news andhra pradesh amit shah write letter to chandrababu naidu