गंगा शुद्धीकरणासाठी जैवोपचार तंत्रज्ञान

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

केंद्राचा निर्णय; सूक्ष्मजीवाणूंच्या मदतीने नदी स्वच्छतेचा प्रयोग

नवी दिल्ली: "स्वच्छ गंगा' मोहिमेचे परिणाम लवकरात लवकर दिसावेत यासाठी केंद्राने आता सूक्ष्मजीवाणूंच्या साह्याने जैवोपचार तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. "स्वच्छ गंगा'साठी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) प्रत्यक्षात येण्यास विलंब लागत असल्याने त्यावर हा उपाय सरकारने शोधला आहे.

केंद्राचा निर्णय; सूक्ष्मजीवाणूंच्या मदतीने नदी स्वच्छतेचा प्रयोग

नवी दिल्ली: "स्वच्छ गंगा' मोहिमेचे परिणाम लवकरात लवकर दिसावेत यासाठी केंद्राने आता सूक्ष्मजीवाणूंच्या साह्याने जैवोपचार तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. "स्वच्छ गंगा'साठी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) प्रत्यक्षात येण्यास विलंब लागत असल्याने त्यावर हा उपाय सरकारने शोधला आहे.

"एसटीपी'साठी दोन- तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यासाठी कचऱ्यावर जगणाऱ्या जीवाणूंचा वापर जैवोपचारासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. यामुळे गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणार असली, तरी या प्रयोगाला मर्यादा आहेत. या तंत्रज्ञानात सूक्ष्मजीवाणू हे तेल व सेंद्रिय पदार्थ नष्ट करतील. कोणत्याही दुर्गंधीशिवाय सांडपाण्याचा निचरा करण्यात जीवाणूंची यात महत्त्वपूर्ण भूमिका असेल. मैलापाण्यामुळे येणारा दुर्गंधही या प्रक्रियेत कमी करता येणार आहे. विषारी रासायनिक द्रव्ये आणि अवजड धातूंमुळे होणारे प्रदूषणही कमी होईल. सांडपाण्यातील प्रदूषित घटकांच्या प्रमाणात हा जैवोपचार आवश्‍यकतेनुसार करण्यात येणार आहे.

पाटण्यातील बकारगंज नाल्यावर केलेली जैवोपचार तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहीम प्राधिकरणाने पाटणा आणि अलाहाबादमधील दोन पथदर्शी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यानंतर देशातील चार राज्यांमधील आणखी 54 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याचा सरकारचा विचार आहे. यात उत्तर प्रदेशमधील 30, पश्‍चिम बंगालमधील 20, बिहारमधील तीन आणि झारखंडमधील एका स्थानाचा समावेश आहे. गंगा नदीत जेथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित पाणी सोडले जाते, तेथे हा प्रयोग करून प्रदूषणाची व्याप्ती कमी करण्यात येणार आहे.

कमी खर्च, कमी कालावधी
जैवोपचार पद्धतीने गंगेचे प्रदूषण कमी करण्यासाठी कमी खर्च लागणार असून याचे परिणामही केवळ 6 ते 8 महिन्यांत दिसणार आहेत. सांडपाण्यामुळे गंगा व तिच्या उपनद्यांच्या पाण्याची गुणवत्ता ढासळली असून, जीवाणूंमुळे ती सुधारण्यास मदत होणार आहे, असे राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहीम प्राधिकरणाने सांगितले. या प्रयोगासाठी साधारण सात लाख ते 17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतून (सीएसआर) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती जलस्रोत विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली.

प्रस्तावित ठिकाणे
कानपूर ः गोलाघाट, राणीघाट, बुधियाघाट
अलाहाबाद ः ससुरखादेरी, मवाय्या
वाराणसी ः नागवा, राजघाट
भागलपूर ः सकीलचंद
हावडा ः रामकृष्ण मुळीक घाट, तेलकल घाट

Web Title: new delhi news Biotechnology Technology for Ganga river Purification