चीन सीमेवर आणखी पन्नास ठाणी उभारू: राजनाथसिंह

वृत्तसंस्था
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

"आयटीबीपी'च्या स्थापना दिनानिमित्त अनेक सुधारणांचे आश्‍वासन

ग्रेटर नोएडा : भारत-चीन सीमेवर भारत तिबेट पोलिस दलाची (आयटीबीपी) आणखी पन्नास ठाणी उभारण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उंचीवर असलेल्या "आयटीबीपी'च्या सर्व तळांवर वर्षभर 20 अंश सेल्सिअस तापमान असेल, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

"आयटीबीपी'च्या स्थापना दिनानिमित्त अनेक सुधारणांचे आश्‍वासन

ग्रेटर नोएडा : भारत-चीन सीमेवर भारत तिबेट पोलिस दलाची (आयटीबीपी) आणखी पन्नास ठाणी उभारण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उंचीवर असलेल्या "आयटीबीपी'च्या सर्व तळांवर वर्षभर 20 अंश सेल्सिअस तापमान असेल, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

"आयटीबीपी'चा 56 वा स्थापना दिन आज येथे साजरा करण्यात आला. या वेळी राजनाथसिंह यांनी या निमलष्करी दलाची क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची यादीच जाहीर केली. अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सीमेवर 25 रस्ते, नऊ हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या जवानांसाठी विशेष हलक्‍या वजनाचे गरम कपडे आणि गस्त घालण्यासाठी नव्या स्नो स्कूटर्स या उपायांचा यादीमध्ये समावेश होता. जवानांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले, ""तुमच्या कृती आणि पायाभूत क्षमतेमध्ये सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. दलासाठी आणखी पन्नास ठाणी उभारण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर असून, त्यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. तसेच अतिउंचीवरील थंडीचा आणि जीवघेण्या बोचऱ्या वाऱ्यांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून तळांवर वीस अंश सेल्सिअस तापमान राहील, यासाठी प्रयत्न केले जातील.'' प्रचंड हिमवर्षावातही या ठाण्यांवर जवान सुरक्षित आणि सज्ज राहण्यासाठी हा उपाय केला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. वीस अंश तापमान कायम राखणाऱ्या ठाण्याचे प्रारूप लडाख सीमेवर तयार केले असून, अशी ठाणी सिक्कीम आणि ईशान्य सीमेवरही उभारली जातील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

अतिउंचीवरील ठाण्यांना सुधारित रस्ते, मोबाईल आणि उपग्रह संपर्क सेवा पुरविण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले. सीमेवर राहणारे नागरिकांशी जवानांनी चांगले संबंध ठेवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. सीमेवर हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबांपैकी एका तरी कुटुंबाची जबाबदारी "आयटीबीपी'च्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत आणि चीन दरम्यानच्या 3,488 किमी लांब सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी भारत-तिबेट पोलिस दलावर आहे. या दलाची स्थापना 1962 ला करण्यात आली. भारत-चीन सीमेवर सध्या "आयटीबीपी'ची 176 ठाणी असून, एकूण 90 हजार जवान या दलामध्ये आहेत.

नव्या यंत्रसामग्री तुकडीचे संचलन
"आयटीबीपी'ने आज आपल्या पहिल्या चिलखती गाड्या आणि यंत्रसामुग्री तुकडीचे प्रदर्शन केले. भारत-चीन सीमेवर जवानांची वेगाने ने-आण करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या तुकडीमध्ये लष्करी ट्रक, एसयूव्ही, एटीव्ही, स्नो स्कूटर, दुचाकी गाड्या, खाणकाम करणारी यंत्रे, चार चाकी गाड्या, मोबाईल कम्युनिकेशन विंग यांचा ताफा आहे. या तुकडीच्या पॅरा कमांडोंनी या वेळी आपले पहिले संचलन केले. या जवानांना रात्रीच्या युद्धाचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. या तुकडीत एकूण 250 वाहने आहेत.

Web Title: new delhi news china border chowky and rajnathsingh