गोपालकृष्ण गांधी यांचाही अर्ज दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जुलै 2017

आपली उमेदवारी कोणत्याही व्यक्तीला किंवा पक्षाला विरोध करण्यासाठी नाही, तर आपण जनतेची इच्छा म्हणून आपण विनम्रपणे मतदारांना साद घातली आहे.
- गोपालकृष्ण गांधी, "यूपीए'चे उमेदवार

नवी दिल्ली: कॉंग्रेससह 18 विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग तसेच शरद यादव, सीताराम येचुरी आदी नेत्यांच्या उपस्थितीत गोपालकृष्ण गांधी यांनी संसद भवनात अर्ज भरला. "एनडीए'चे उमेदवार असलेले माजी केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्याशी त्यांची लढत असेल.

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पाच ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी आज वेंकय्या नायडू आणि गोपालकृष्ण गांधी या दोन्हीही उमेदवारांनी वेगवेगळ्या वेळी अर्ज दाखल केले. गोपालकृष्ण गांधी हे कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, द्रमुक यांच्यासह 18 राजकीय पक्षांचे संयुक्त उमेदवार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान "एनडीए'चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर करणाऱ्या संयुक्त जनता दलाने उपराष्ट्रपतिपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांना समर्थन दिले आहे, तर आतापर्यंत सत्ताधारी भाजपच्या बाजूने सातत्याने उभे राहणाऱ्या बीजू जनता दलानेही गोपालकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला आहे.

गोपालकृष्ण गांधी यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून उमेदवारी अर्ज भरला. यानंतर प्रसारमाध्यांशी संवादही साधला. आपली उमेदवारी कोणत्याही व्यक्तीला किंवा पक्षाला विरोध करण्यासाठी नाही, तर आपण जनतेची इच्छा म्हणून आपण विनम्रपणे मतदारांना साद घातली आहे, अशी टिप्पणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारच मतदान करतात. दोन्ही सभागृहांची एकूण सदस्यसंख्या (निर्वाचित आणि राष्ट्रपतींद्वारा नियुक्त मिळून) 790 एवढी आहे. मात्र, लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत, तर कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार शांताराम नाईक 29 जुलैला निवृत्त होणार असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही. याखेरीज भाजपचे बिहारमधील खासदार छेदी पासवान हे न्यायालयीन आदेशामुळे मतदानासाठी अपात्र आहेत. हे पाहता एकूण 784 खासदार या निवडणुकीसाठी मतदान करतील. अर्थात, "एनडीए'कडे पाचशेहून अधिक मते असल्यामुळे नायडू यांचे पारडे जड आहे.

Web Title: new delhi news congress gopalkrishna gandhi