दिल्लीतील आरोग्य आणीबाणी हळूहळू माघारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली: विषारी हवेचा व धूर-धुक्‍याचा राजधानी दिल्ली व परिसरावरील विळखा आज दुपारपासून हळूहळू कमी होऊ लागला आहे. हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीनंतर आज सकाळपासून वारे वाहू लागल्याने दिल्लीतील स्मॉगचा विळखा कमी झाला. परिणामी पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण अधिकारिणीने (ईपीसीए) दिल्लीतील आरोग्य आणीबाणीचे आपत्कालीन प्रतिबंध हटविण्याची सूचना सरकारसह संबंधितांना केली आहे.

नवी दिल्ली: विषारी हवेचा व धूर-धुक्‍याचा राजधानी दिल्ली व परिसरावरील विळखा आज दुपारपासून हळूहळू कमी होऊ लागला आहे. हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीनंतर आज सकाळपासून वारे वाहू लागल्याने दिल्लीतील स्मॉगचा विळखा कमी झाला. परिणामी पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण अधिकारिणीने (ईपीसीए) दिल्लीतील आरोग्य आणीबाणीचे आपत्कालीन प्रतिबंध हटविण्याची सूचना सरकारसह संबंधितांना केली आहे.

अर्थात हे आरोग्य संकट वाढत्या थंडीबरोबर आगामी काळात पुन्हा दिल्लीवर आक्रमण करण्याची आशंकाही बोलून दाखविली जात आहे. ईपीसीएने बाहेरच्या राज्यांतील अवजड वाहनांच्या दिल्लीतील प्रवेशालाही हिरवा कंदील दिला आहे. आज सकाळपासूनच दिल्लीत स्मॉगचा प्रभाव कमी झाल्याचे साध्या डोळ्यांनीही दिसत होते. गेले किमान दोन आठवडे स्मॉगच्या विळख्यात विषारी श्‍वास घेणाऱ्या कोट्यवधी दिल्लीकरांची अखेर निसर्गालाच दया आल्याचे हे लक्षण मानले जाते. स्मॉगमुळे हजारो दिल्लीकर रुग्णालयांच्या बाहेर रांगा लावत होते. या दरम्यान (6 नोव्हेंबर) ईपीसीएने आणीबाणीचे उपाय लागू केले होते. यात बाहेरच्या ट्रक-वाहनांवर बंदी, नव्या बांधकामांचे काम थांबविणे, मेट्रो पार्किंगचे दर चौपटीने वाढविणे आदी उपायांचा समावेश होता. आज सकाळपासून हवेतील घातक पीएम कणांची पातळी अतिधोकादायक यापेक्षा खाली आल्याने हे मनाईहुकूम दुपारपासून हटविण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, राजधानीत सम विषम वाहतूक प्रणाली पुन्हा लागू करण्याबाबत दिल्ली सरकारच्या याचिकेवर वारंवार फटकारणारा राष्ट्रीय हरित लवाद उद्या (ता.17) सुनावणी घेणार आहे. केजरीवाल सरकारने गेली काही वर्षे हरित करापोटी घेतलेल्या किमान 787 कोटींच्या निधीचे काय केले? असा सवाल भाजपसह विरोधक विचारत आहेत. ईपीसीएचे अध्यक्ष भुरेलाल यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा व पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्रे लिहिली. त्यात त्यांनी आणीबाणी आरोग्य उपाययोजना तत्काळ प्रभावाने मागे घेण्याची सूचना केली आहे. दिल्लीतील हवेची मानके स्थिर पातळीपर्यंत आल्याने तूर्त या उकडक पायांची गरज नाही, त्यामुळे ते चालू ठेवू नयेत, असेही भुरे लाल यांनी म्हटले आहे.
 

महात्मा गांधींनाही मास्क !
दिल्लीतील दूषित हवेबाबत उपाययोजना करण्यात आप सरकार संपूर्ण अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 11- मूर्ती भागातील (मदर तेरेसा क्रिसेंट) पुतळ्यालाही मास्क बांधण्यात आला. आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रा, भाजपचे मनजिंदर सिरसा आदींनी कार्यकर्त्यांसह कॅनॉट प्लेस व 11- मूर्ती परिसरात निषेध आंदोलन केले. या वेळी लोकांनाही मास्कचे वाटप करण्यात आले. मिश्रा व सिरसा यांनी गांधीजींच्या व इतर पुतळ्यांच्या नाकाला मास्क बांधले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news delhi polluction reduction