डिजिटल निरक्षरतेमुळे जगणे कठीण

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी

नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी

नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे.

या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी 85.8 टक्के नागरिक डिजिटल व संगणक निरक्षर असल्याचे आढळले. त्यात ज्येष्ठ पुरुषांचे प्रमाण 76.5 टक्के तर महिलांचे प्रमाण 95 टक्के आहे. यापैकी 74.9 टक्के लोकांनी सांगितले, की संगणक हाताळण्याच्या प्रशिक्षणाअभावी आणि डिजिटल निरक्षरतेमुळे वृद्धावस्थेत दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगात भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. युवा पिढीला आधुनिक माहिती-तंत्रज्ञान चांगलेच अवगत असते. सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. पण संगणक, लॅपटॉप, टॅब व स्मार्ट फोन ही आताच्या जगात गरजेची असलेली तंत्र आयुधांपासून ज्येष्ठांची पिढी चार हात दूरच आहे, असे या पाहणी अहवालात म्हटले आहे.

दोन पिढ्यांमधील वाढत जाणाऱ्या अंतरामुळे ज्येष्ठांच्या आयुष्यावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी या संस्थेने दिल्ली व एनसीआर परिसरातील पाच हजार जणांशी नुकताच संवाद साधला. संगणक व डिजिटल यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी फारशा सुविधा उपलब्ध नसल्याचा दावा 51 टक्के जणांनी केला. डिजिटल शिक्षणाबद्दल माहिती नसल्याचे 44.6 टक्के ज्येष्ठांनी सांगितले. केवळ 4.5 टक्के लोकांना असे प्रशिक्षण कोठे मिळते, याची माहिती असल्याचे निदर्शनास आले.

डिजिटल साक्षरता फायदेशीर
तरुणांचा अधिकाधिक सुखदायी जीवनशैलीचा अट्टहास आणि संवादासाठी आवश्‍यक असलेली तांत्रिक भाषेशी जुळवून घेता येत नसल्याने 85 टक्के ज्येष्ठांचा कुटुंबातील युवा पिढीशी संवाद तुटलेला आहे. यासाठी ज्येष्ठांना डिजिटल वस्तूंचे प्रशिक्षण देण्यावर भर या अहवालात दिला आहे. यामुळे ज्येष्ठांसाठी लाभदायक असलेल्या सरकाच्या आर्थिक योजना, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी चॅटिंग करणे, इंटरनेट बॅंकिंग, विविध बिलांचे ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन मनोरंजन सुविधा याचा फायदा त्यांना घेता येईल. वयाचा बाऊ न करता असे प्रशिक्षण घेण्यात 69.8 टक्के ज्येष्ठांनी रस दाखविला आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

डिजिटल निरक्षरता...( टक्केवारीत)
85.8
एकूण प्रमाण

76.5
ज्येष्ठ पुरुष

95
ज्येष्ठ महिला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news Difficult to live with digital illiteracy