दिग्विजयसिंह यांचा नवा 'ट्विटवाद'

वृत्तसंस्था
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; अपशब्द वापरल्याचा इन्कार

नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून अपशब्द असलेला संदेश ट्विट केल्यावरून नवा वाद उद्भवला आहे. कॉंग्रेसने या वादापासून अंतर राखणे पसंत केले असून, दिग्विजयसिंह यांनी मात्र, अपशब्द वापरले नसल्याचा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; अपशब्द वापरल्याचा इन्कार

नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून अपशब्द असलेला संदेश ट्विट केल्यावरून नवा वाद उद्भवला आहे. कॉंग्रेसने या वादापासून अंतर राखणे पसंत केले असून, दिग्विजयसिंह यांनी मात्र, अपशब्द वापरले नसल्याचा दावा केला आहे.

वेगवेगळ्या मुद्‌द्‌यांवर वादग्रस्त मते मांडण्यात पटाईत असलेल्या दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान मोदींची कार्यशैली आणि समर्थकांना उद्देशून ट्विट केले. पंतप्रधान मोदी हे लोकांना मूर्ख बनविण्यात पटाईत आहेत, अशी टिप्पणी करताना दिग्विजयसिंह यांनी मोदी समर्थकांचा भक्त असा उल्लेख केला. मात्र, या ट्विटसोबत मोदींचे छायाचित्र आणि अपशब्दांचा समावेश असलेला मजकूरही दिग्विजयसिंह यांनी पोस्ट केला. या मजकुरात "माझ्या दोन कामगिरी. एक - भक्तांना .... बनविणे आणि ... भक्त बनविणे', असे म्हटले आहे. सोबतच, हा मजकूर आपला नाही, परंतु तो पोस्ट करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. ज्यांच्याबद्दल (पंतप्रधान नरेंद्र मोदी) पोस्ट आहे, त्यांची मी क्षमा मागतो. ते मूर्ख बनविण्यात पटाईत आहेत, असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले.

"मोदी मूर्ख बनविण्यात पटाईत'
या ट्विटवर सत्ताधारी भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर दिग्विजयसिंह यांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्विटमध्ये असलेले अपशब्द माझे नाहीत, ते (मोदी) मूर्ख बनविण्यात पटाईत आहेत, असेच माझे म्हणणे असून त्यावर मी ठाम आहे, असे दिग्विजयसिंह यांनी स्पष्ट केले. अपशब्दांचा उल्लेख असलेले छायाचित्र माझे नाही आणि मी त्याच्याशी सहमत नाही. रिट्विट करणे म्हणजे सहमत असणे असे नाही. मोदीभक्त माझ्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. मात्र, त्यांच्या शिव्याशापांबद्दल मला आनंद वाटतो. कारण, मोदींकडून आणि पैसे देऊन त्यांना मूर्ख बनविण्यात आले आहे, अशीही टिप्पणी दिग्विजयसिंह यांनी केली.

कॉंग्रेसकडून कानपिचक्‍या
या प्रकरणावर कॉंग्रेस पक्षाने भाष्य करणे टाळले. कॉंग्रेसच्या दैनंदिन वार्तालापादरम्यान मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. खुद्द दिग्विजयसिंह यांनी खुलासा केला असल्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असे सुरजेवाला यांनी सांगितले. मात्र, कॉंग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी, "सार्वजनिक जीवनात असंसदीय भाषेचा वापर केला जाऊ नये', अशा कानपिचक्‍या दिग्विजयसिंह यांना दिल्या.

Web Title: new delhi news Digvijay Singh's new 'Twitism'