फ्रान्सबरोबरील संरक्षण सहकार्य दृढ

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

धोरणात्मक भागीदारी हा प्रकार तसा नवीन आहे. मात्र, आध्यात्मिक भागीदारी अनेक शतके जुनी आहे. भारताच्या परंपरेत जसे रामकृष्ण परमहंस, गुरू अरविंद आहेत तसेच फ्रान्सच्या परंपरेतही व्होल्टायर, व्हिक्‍टर ह्युगो आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे पुरावे केवळ फ्रान्समध्येच नाही, तर भारतातही आढळतात.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

युद्धनौकांसाठी एकमेकांचे नौदल तळ खुले; इतर 14 करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : आपले नौदल तळ एकमेकांच्या युद्धनौकांसाठी खुले करण्याचा निर्णय आज भारत आणि फ्रान्सने घेतला आहे. शिवाय अणुऊर्जा आणि सुरक्षा या क्षेत्रांसह एकूण 14 करारही आज करण्यात आले. या करारांमुळे दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर दोन नेत्यांच्या उपस्थितीत 14 करारांवर सह्या करण्यात आल्या. सुरक्षा, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, गोपनीय माहितीचे संरक्षण, शिक्षण, पर्यावरण, शहर विकास आणि रेल्वे या क्षेत्राशी संबंधित हे करार आहेत. संरक्षण सहकार्य वाढविताना दोन्ही देशांनी आपापले नौदल तळ एकमेकांच्या युद्धनौकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. हिंदी महासागरात वर्चस्व निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना आळा घालण्याचा हा प्रयत्न आहे. या करारानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोदी यांनी फ्रान्सबरोबरील मैत्री अधिक दृढ झाली असल्याचे सांगितले. मॅक्रॉन यांनीही संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये दोन देशांचे संबंध अधिक चांगले असून, दहशतवाद आणि कट्टरतावाद यांच्याबरोबर लढण्यासाठी आम्ही एकत्र काम करू, असे सांगितले. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला आता अधिक विशेष महत्त्व आल्याचेही मॅक्रॉन म्हणाले. मॅक्रॉन आणि मोदी यांच्यामध्ये भारत-प्रशांत प्रदेशामध्ये सहकार्य वाढविण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. सागरी सहकार्याबाबत संयुक्त धोरणात्मक आराखडा तयार करण्याचे या वेळी मान्य करण्यात आले.

दरम्यान, मॅक्रॉन यांचे काल (ता. 9) रात्री नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर आज मोदी यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाबरोबरही चर्चा केली.

मैत्री क्‍लबची स्थापना
वाराणसी : मॅक्रॉन हे आपल्या दौऱ्यात वाराणसीलाही भेट देणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील युवक आणि काही फ्रान्सच्या नागरिकांनी मिळून "इंडो-फ्रेंच फ्रेंड्‌स क्‍लब'ची स्थापना केली आहे. दोन देशांमधील नागरिकांमधील थेट संवाद वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविणार असल्याचे या क्‍लबचे संस्थापक उत्तम ओझा यांनी सांगितले.

Web Title: new delhi news france india protection