सरकार अधिवेशन टाळतेय; काँग्रेसचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबण्याचे संकेत मिळत असल्यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. गुजरात निवडणुकीमुळे सरकार अनिष्ट पायंडे पाडत असून, शाह-जादा, शौर्य डोवाल प्रकरणांवर चर्चा नको असल्यामुळे सरकार अधिवेशन टाळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबण्याचे संकेत मिळत असल्यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसने मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. गुजरात निवडणुकीमुळे सरकार अनिष्ट पायंडे पाडत असून, शाह-जादा, शौर्य डोवाल प्रकरणांवर चर्चा नको असल्यामुळे सरकार अधिवेशन टाळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

संसदेचे अधिवेशन बोलावणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषयक समितीची (सीसीपीए) बैठक अजून झालेली नाही. सीसीपीएच्या बैठकीनंतरच अधिवेशनाची औपचारिक अधिसूचना काढली जाते. लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदार संघातून येण्यासाठी, तसेच संसदेशी संबंधित कामकाजाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून अधिसूचनेनंतरच्या पंधरा दिवसांनी अधिवेशन भरत असते. त्यामुळे एरवी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा नेमके कधी सुरू होणार या प्रश्‍नाचे उत्तर गुलदस्तात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीवर मोदी सरकारने लक्ष केंद्रीत केल्यामुळेच अधिवेशनाला विलंब होत असल्याचे बोलले जाते. तर हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होऊ शकते मात्र ते अल्पकालिन म्हणजे दोन आठवड्यांचे असू शकते, असेही सांगितले जात आहे.

अधिवेशनाबाबतच्या संदिग्धतेबाबत काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सरकारवर आगपाखड केली. एखाद्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक होत असल्याचे 2017 हे पहिलेच वर्ष नाही. भारतात दरवर्षी एखाद्या तरी राज्यामध्ये निवडणूक होतच असते. त्यामुळे केवळ गुजरात निवडणुकीसाठी (संसद अधिवेशन लांबविण्याचा) पायंडा पाडला जात असेल तर पुढील वर्षी सरकार काय करणार, अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत कोणाशी चर्चा केली, असा सवाल सिंघवी यांनी केला. केवळ नावापुरता आठवडा, दोन आठवड्याचे अधिवेशन घेण्याचा सरकारचा मानस दिसतो. सरकारने हा पायंडा आता पाडला तर अन्य राज्यांबाबतही असे करणार काय, लोकशाहीच्या स्तंभाबद्दल सरकारने गांभीर्याने विचार करावा. सर्व गोष्टी निवडणुकीच्या राजकारणाच्या चष्म्यातून पाहिल्या जाऊ नयेत, असाही सल्ला सिंघवी यांनी दिला.

Web Title: new delhi news Government avoids session; Congress allegations