नितीन पटेल यांचे उद्दिष्ट मुख्यमंत्रिपदच

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 जानेवारी 2018

लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय करावा लागणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय करावा लागणार

नवी दिल्ली: गुजरातसारख्या श्रीमंत राज्यात आपल्या पसंतीचे अर्थमंत्रालय न मिळाल्याने नाराज झालेले उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली असली, तरी त्यांचे खरे उद्दिष्ट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हेच असल्याचे दिल्लीत सांगितले जाते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी समजूत काढल्यावर व नंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरध्वनी गेल्यावर पटेल यांनी तलवार म्यान केल्याचे समजते. किंबहुना गुजरातच्या सत्तेची चावी हाती असणाऱ्या पटेल समुदायाची नाराजी कायम असण्याच्या काळात पंतप्रधान नरेद्र मोदी यांना 2019 च्या लोकसभेच्या परीक्षेपूर्वी आज ना उद्या पटेल यांच्यासारखा निष्ठावंत व अनुभवी चेहरा गुजरातेत आणणे भागच पडणार असल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे.

नितीन पटेल यांचा सौम्य स्वभाव ओळखणारे भाजप नेते ते बंड वगैरे करतील यावर अजूनही विश्‍वास ठेवत नाहीत, त्यामुळेच पटेल हे काँग्रेसमध्ये सामील होणार वगैरे अफवांवर खुद्द त्या पक्षाच्या गुजरातेतील नेत्यांना हसू आवरले नसणार, असा दावा एका पक्षनेत्याने केला. भाजप सूत्रांच्या म्हणण्यानुसार मोदी यांच्यानंतर पटेल हेच खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, तरीही त्यांच्यापासून गेली पावणेचार वर्षे ते पद दूर पळत राहिले व त्यांनीही याबाबत जाहीर वाच्यता केली नाही. मोदी व पटेल यांच्यातील संवादही उत्तम या धर्तीचा आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या वादात पदाची सूत्रे घेतली नाहीत, तरी रूपानी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीस ते हजर राहिले होते.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पटेल यांना काही तरी निश्‍चित शब्द भाजप नेतृत्वाकडून मिळालेला असणार व त्याशिवाय ते मंत्रिपदाची सूत्रे न घेण्याइतके टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. याबाबत शहांच्या दूरध्वनीबाबत सांगितले जाते; मात्र शहा यांच्या व्यतिरिक्त खुद्द पंतप्रधानांशी बोलणे झाल्याशिवाय नितीन पटेल माघार घेणारे नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शहा यांची मध्यस्थी व त्यापलीकडील एका "अदृश्‍यातील आदेशा'चा परिणाम पटेल यांची नाराजी दूर होण्यात झाल्याचे सांगितले जाते. हार्दिक पटेल याने नितीन पटेल यांना भेटणार असल्याचे सांगितले होते, तसा प्रयत्न यापुढेही होईल; मात्र यासाठी पटेल यांनी हार्दिक यास अपॉइंटमेंट देणे गरजेचे आहे व त्यांच्या कथित नाराजी काळातही ती अपॉइंटमेंट मिळालेली नव्हती, याकडे भाजप नेते लक्ष वेधतात.

काँग्रेसमध्ये जाणे अशक्‍य
मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर पटेल यांनी सांगितले, की भाजपच्या या अंतर्गत बाबीचा राजकीय फायदा घेऊन त्याद्वारे सत्ता काबीज करण्याचा काँग्रेसचा हेतू होता. पण त्यांना नितीन पटेल भाजपचे किती एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत हे माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये जाण्याची कल्पनाही करू शकत नाही, हे त्यांचे म्हणणे शंभर टक्के खरे असल्याचे दिल्लीतील एका वाघेला समर्थक नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच आगामी काळात नितीन पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील व लोकसभा निवडणुका गुजरातेत त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप लढवेल, अशी प्रबळ चिन्हे दिसत आहेत.

Web Title: new delhi news gujrat and nitin patel