आमदारांच्या पळवापळवीचा काँग्रेसचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जुलै 2017

राज्यसभेत गदारोळ; समाजवादी पक्षाचीही साथ

नवी दिल्ली: गुजरातमध्ये भाजप सरकार राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या आमदारांची सरळसरळ पळवापळवी करत असल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने आज राज्यसभा बंद पाडली. गेल्या 24 तासांत काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपची वाट धरलेल्या या राज्यातील पूनाजी पटेल नामक काँग्रेस आमदाराचे तापी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकाने अपहरण केल्याचा आरोप करीत काँग्रेसने जोरदार गोंधळ केला. भाजपने "यांना यांचे घर सांभाळता येत नसताना, हे गल्लीत आरडाओरडा करत आहेत,' असा प्रतिहल्ला चढविला.

काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची गुजरातमधून पुन्हा निवडून येण्याची वाट बिकट झाल्यानेच काँग्रेसने हे प्रकरण उकरून काढल्याचे भाजपचे म्हणणे आहे. शून्य प्रहराच्या सुरवातीला विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की तापी जिल्ह्याच्या ज्या पोलिस अधिकाऱ्याने गावित यांचे अपहरण केले, तो बनावट चकमकीत दोषी ठरल्याने तरुंगात जाऊन आलेला गुन्हेगार आहे. अशा अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजप गुजरातेत राजकीय दहशत पसरवत आहे. तुम्हाला आमदारांची पळवापळवी करायला देशाचे सरकार दिले आहे का? तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. समाजवादी पक्षाचे नरेश आगरवाल यांनीही राज्यांतील भाजप सरकारे विरोधी पक्षांच्या आमदारांचा छळ करत असल्याची तक्रार केली.

उपसभापती पी. जे. कुरियन यांनी हा मुद्दा येथे काढून काही फायदा नाही. तुम्ही निवडणूक आयोगाकडे, पोलिसांकडे, न्यायालयात जा, असे काँग्रेसला सांगितले. त्यावर राज्यसभा हे "कौन्सिल ऑफ स्टेट' असल्याने आमदार हे आमचे मतदार आहेत व भाजप त्यांचेच अपहरण करण्यासारखे प्रकार करू लागल्याने हा विषय याच सभागृहात काढणे योग्य ठरते, असा मुद्दा काँग्रेस सदस्यांनी मांडला. आझाद म्हणाले, की ज्या तीन आमदारांनी काल काँग्रेस सोडली, त्यातल्याच एकाला तुम्ही राज्यसभेचे तिकीट दिले, याचाच अर्थ तुमच्या मनात काळेबेरे आहे. या पोलिस अधिकाऱ्याने संबंधित आमदाराला विधानसभा तिकिटाचे आमिष दाखविले. आता काँग्रेसच्या राज्यांतील तिकिटांचा निर्णय तुमचे पोलिस अधिकारी घेणार का?

पुरुषोत्तम रूपाला यांनी सांगितले, की हा काँग्रेसचा अंतर्गत वाद आहे. राज्यातील वाद येथे आणून विरोधी पक्ष गुजरातलाही बदनाम करत आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. रूपाला इतके आवेशाने बोलत होते, की कुरियन यांनी, त्यांना अजून ते विरोधी बाकांवरच असल्यासारखे वाटते, अशी टिप्पणी केली.

विधेयकांचा पाऊस
बिहारमधील घडामोडींनंतर राज्यसभेतील संख्याबळाचे पारडे सरकारकडे झुकत जाणार याचा अंदाज आल्याने भाजपने येथे विरोधकांनी अडवून धरलेली विधेयके प्रचंड मोठ्या संख्येने आणण्याचा सपाटा लावला आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांनी पुढच्या एका आठवड्यातील केवळ पाच दिवसांसाठी राज्यसभेत तब्बल 20 विधेयके चर्चा व मंजुरीसाठी आणण्याची यादी आज जाहीर केली. ही लांबलचक यादी वाचणाऱ्या नक्वी यांना कुरियन यांनी "ही विधेयके आठवड्यासाठी आणणार आहेत की पूर्ण वर्षासाठी?' असा खोचक प्रश्‍न करताच हास्यकल्लोळ उसळला.

Web Title: new delhi news gujrat elction and bjp congress politics