गुजरातसाठी 'नोटा'चा पर्याय घुसडला; विरोधकांचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: राज्यसभेच्या गुजरातमधील येत्या आठ तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभा मतदानात "यापैकी एकही उमेदवार मान्य नाही' म्हणजेच "नोटा'चा पर्याय गुपचूप घुसडल्याचा आरोप राज्यसभेत गाजला. गुजरातमधून भाजपचे अध्यक्ष अमित शहा व स्मृती इराणी यांना भाजप निवडून आणणार आहे.

नवी दिल्ली: राज्यसभेच्या गुजरातमधील येत्या आठ तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभा मतदानात "यापैकी एकही उमेदवार मान्य नाही' म्हणजेच "नोटा'चा पर्याय गुपचूप घुसडल्याचा आरोप राज्यसभेत गाजला. गुजरातमधून भाजपचे अध्यक्ष अमित शहा व स्मृती इराणी यांना भाजप निवडून आणणार आहे.

गुजरातमध्ये आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने "नोटा'चा पर्याय नव्यानेच टाकल्याचे आनंद शर्मा यांनी एका वृत्तपत्र कात्रणाच्या आधारे सांगितले. ते म्हणाले, राज्यघटनेनुसार एखाद्या संसदीय निवडणुकीसाठी संसदेची परवानगी न घेता असा पर्याय टाकणे है गैर आहे. "नोटा'चा पर्याय राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत नव्हता व गुजरात राज्यसभा निवडणुकीत तो अचानक कसा आला, असा प्रश्‍न करीत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित केली. राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी, हा प्रश्‍नोत्तर तासाचा मुद्दा नाही, असे सांगताच विरोधी सदस्यांनी राज्यसभेची निवडणूक प्रभावित करण्याचा प्रकार होत असताना हा मुद्दा येथे नाही तर कोठे उपस्थित करायचा, असा प्रतिप्रश्‍न केला. गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब करावे लागले.

तत्पूर्वी सभागृहनेते अरुण जेटली यांनी, निवडणूक आयोगाने संबंधित निर्णय घेतला असल्याचे सांगून यावर चर्चेला तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, काही न्यायालयीन निर्णयांच्या आधारे आयोगाने हा निर्णय केला असावा. सर्वोच्च न्यायालयाने "नोटा'च्या पर्यायाला यापूर्वीच मान्यता दिली आहे. आयोगाने आता राज्यघटनेच्या कलम 324 नुसार गुजरात निवडणुकीसाठी "नोटा'चा पर्याय सूचविला आहे. मात्र, याबाबतच्या अधिसूचनेवर कोणाला आक्षेप असतील तर आयोगाकडे अन्य पर्यायही आहेत.

आझाद व शर्मा म्हणाले, संसदेच्या निवडणुकीत निवडणूक आयोग सर्वाधिकार गाजवू शकत नाही. कलम 324 नुसार राज्यसभेच्याही निवडणुका होतात.

रेखा, सचिनने राजीनामे द्यावेत
राज्यसभेवर विविध क्षेत्रांतील नामवंतांना आणल्यावर त्यांची संसदेत येण्याबाबतची उदासीनता आज पुन्हा जोरदार चर्चेचा विषय ठरली. खासदार सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांना येथे येण्यातच रस नसेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा; अन्यथा सरकारने देशाबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याप्रमाणे त्यांना सरळ निलंबितच करावे व दोन प्रामाणिक सदस्यांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी सपचे नरेश आगरवाल यांनी केली. 2012 मध्ये "यूपीए' सरकारने या दोघांना खासदार केले होते. मात्र, सचिन 348 दिवसांपैकी केवळ 23, तर रेखा फक्त 18 दिवसच सभागृहात आले.

"नामवंतां'ची उपस्थिती...
- सचिन तेंडुलकर ः 348 पैकी 23 दिवस
- रेखा ः 348 पैकी 18 दिवस

Web Title: new delhi news gujrat election nota and rajya sabha