भारतालाही प्रत्युत्तराचा अधिकार; पाकला इशारा

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

नवी दिल्ली: भारताचे लष्करी कारवाईचे प्रमुख (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज पाकिस्तानच्या त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शस्त्रसंधी भंगाबाबत तक्रार केली. नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा भारताला अधिकार असल्याचेही भट यांनी स्पष्टपणे सांगितले.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबतही चर्चा केली. भारताकडून पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार होत असल्याची तक्रार पाकिस्तानचे "डीजीएमओ' मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी केली. मात्र, भारतीय जवान केवळ पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत असल्याचे भट यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, नियंत्रण रेषेजवळून शस्त्रधारी घुसखोरांवरच केवळ जवानांनी गोळीबार केला असल्याचेही भट यांनी सांगितले. सीमेवर शांतता कायम राखण्याचा उद्देश असला तरी पाकिस्तानकडून गोळीबार होत असताना त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी बजावले. घुसखोरांना पाकिस्तानचे पाठबळ मिळत असल्याबद्दल भट यांनी नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तानने जून महिन्यात 23 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. तसेच पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्‍शन टीमने एकदा हल्ला केला असून, दोन वेळा घुसखोरी झाली आहे. या सर्व घटनांमध्ये तीन जवान हुतात्मा, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: new delhi news india and pakistan firing