"पॅराडाइज'मुळे जयंत सिन्हांवर संकटाचे ढग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मंत्री झाल्यानंतर ओमिडियार कंपनीचा राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण

मंत्री झाल्यानंतर ओमिडियार कंपनीचा राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: काळा पैसा दडविण्यासाठीच्या नंदनवनांमध्ये पैसे ठेवणाऱ्या गब्बर भारतीयांच्या पॅराडाइज पेपर्सने जारी केलेल्या नावांमध्ये भाजप नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र व केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांचे नाव आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारकडून किंवा भाजपकडून याबाबत मौन बाळगण्यात येत आहे. सिन्हा यांनी "मंत्री बनल्यावर आपण संबंधित ओमिडियार नेटवर्क कंपनीचा राजीनामा दिला होता', असा खुलासा आज दुपारी केला तरी त्यांच्या मंत्रिपदावर यामुळे संकटाचे ढग जमा झाले आहेत. आगामी हिवाळी संसद अधिवेशनातही यावरून वादळ होणार व सरकार जयंत सिन्हांनाच उत्तर द्यायला उभे करणार, अशी चिन्हे आहेत.

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यामुळे आधीच अवघडलेली स्थिती झालेले सिन्हा यांच्यावर टांगती तलवार असून, तूर्तास त्यांच्या राज्य मंत्रिपदाच्या अधिकारांना पीएमओकडून आणखी कात्री लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. काळ्या पैशाचे नंदनवन असलेल्या विदेशात घबाड गुंतवणाऱ्यांत भाजप व संघाचे दुसरे नेते खासदार आर. के सिन्हा यांचेही नाव आहे. पॅराडाइज पेपर्सने याबाबत केलेल्या स्फोटक खुलाशात ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्यासह जगभरातील 180 देशांतील अनेक लब्धप्रतिष्ठितांची नावे आहेत. अमिताभ बच्चन व चिदंबरम पुत्र कार्ती यांच्यासह 714 भारतीयांचाही यात समावेश आहे. दरम्यान, राजकीय पातळीवर मोदी सरकारच्या आणखी एका मंत्र्याचे नाव गोवले गेल्याने विरोधकांच्या हाती मोठा मुद्दा लागला आहे. विरोधी पक्ष याबाबत आगामी संसद अधिवेशनात गदारोळ करण्याची शक्‍यता आहे. भाजपतर्फे उद्यानंतर यावर रविशंकर प्रसाद वा अन्य एखादा मंत्री खुलासा करेल, असे समजते. दरम्यान, सिन्हा यांनी आज एकामागोमाग 6 ट्विट करून याबाबतचा खुलासा केला. हे वृत्त छापणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्राला आपण याआधीच सारा तपशील दिलेला आहे, असे सांगून सिन्हा म्हणतात, की मी केलेली पैशांची देवघेव ही संपूर्ण कायदेशीर व व्यावसायिक कारणासाठीची होती. जगातील आघाडीच्या ओमिडियार नेटवर्कची भागीदार असलेल्या डिलाइट बोर्ड कंपनीत माझा सहभाग होता, हे मी लपविललेले नाही. सारे व्यवहार कायदेशीरदृष्ट्या केले गेले होते.

"ओमिडियार सोडल्यावर डिलाइट कंपनीचे संचालकपद कायम ठेवण्यास मला सांगितले गेले; मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर मी तत्काळ संबंधित संचालकपदे सोडली. त्यांचा राजीनामा दिला. संबंधित आर्थिक व्यवहार हे मी व्यक्तीशः किंवा स्वतःच्या लाभासाठी नव्हे, तर या कंपन्यांचा प्रतिनिधी म्हणून केलेले होते''.
- जयंत सिन्हा, केंद्रीय मंत्री

Web Title: new delhi news jayant sinha Paradise Papers no transactions done for 'personal purpose