भाजपचे 'भीष्माचार्य' प्रचारापासून दूरच

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 डिसेंबर 2017

नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांची ही स्थिती आहे. अगदी अखेरच्या टप्प्यात ते मतदान करायला अहमदाबादेत जातील, असे सांगण्यात येते.

गुजरातच्या रणधुमाळीत कॉंग्रेस नेत्यांकडून अडवानींच्या अनुपस्थितीचा जाहीर उल्लेख झाला किंवा त्याबाबत फारच चर्चा सुरू झाली, तर मतदानाच्या अगदी तोंडावर त्यांना गुजरातला नेण्यात येईल, असे संकेत भाजपमधून मिळतात. अडवानी या विषयावर भाजपमध्ये कोणीही बोलत नाही. गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे चार मुख्यमंत्री व डझनभर केंद्रीय मंत्री प्रचाराला जुंपले आहेत. मात्र, राष्ट्रीय माध्यम कक्षातून फक्त मोदी व अमित शहा या दोनच नेत्यांच्या प्रचाराची, फोटोंची, शहांच्या पत्रकार परिषदांची प्रसिद्धी होत आहे. गेल्या महिनाभराचा आढावा घेतला तर 30 पैकी 30 दिवस भाजपमधून पाठविलेले बहुतांश ई-मेल व छायाचित्रे मुख्यतः फक्त या दोनच नावांभोवती फिरत असल्याचे दिसते. मग बाकीचे मंत्री व नेते तेथे काय करत आहेत, हा प्रश्‍न भाजप नेते टाळतात. गृहमंत्री राजनाथसिंह हेही गुजरातपासून अद्याप दूर आहेत.

अडवानींच्या गुजरातेतील संभाव्य उपस्थितीबद्दल काही पत्रकारांनी वाढदिवशी त्यांनाच "आप गुजरात में कब जाएंगे अडवानीजी?' असे विचारले होते. या प्रश्‍नावर अडवानींनी जुळवलेले फक्त स्मितहास्य केले. मात्र त्यांच्या निकटवर्तीयांनी, "हॉं हॉं, वो वोट देने जाएंगे ना,' असे सांगितले होते. गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास केवळ आठ दिवस उरले आहेत. नऊ व 14 तारखेला मतदान आहे.

प्रचारकांच्या यादीत मात्र नाव
भाजपने पहिल्या टप्प्यासाठी गुजरातेतील स्टार प्रचारकांची जी यादी निवडणूक आयोगाला सादर केली, त्यात अडवानींचे नाव आहे. मोदी व शहा यांच्यानंतर तिसरे नाव अडवानींचेच आहे. मार्गदर्शक मंडळातील मुरली मनोहर जोशी यांचे तर नावही यादीत नाही व राजनाथसिंह गुजरातपासून दूर आहेत. सुषमा स्वराज एकदा तेथे जाऊन आल्या. अडवानी हे गुजरातमध्ये आतापावेतो प्रत्येक निवडणुकीत प्रचार करत. ते प्रचारातून पार अदृश्‍य होण्याची ही पहिलीच निवडणूक आहे. अडवानी गेली तब्बल 19 वर्षे गांधीनगरचे खासदार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new delhi news lal krishna advani and gujarat assembly elections